You are currently viewing सह्याद्रीच्या दुर्गम भागातील घारपी-फुकेरीत BSNL 4G सेवा सुरू!

सह्याद्रीच्या दुर्गम भागातील घारपी-फुकेरीत BSNL 4G सेवा सुरू!

सह्याद्रीच्या दुर्गम भागातील घारपी-फुकेरीत BSNL 4G सेवा सुरू!

*बहुप्रतीक्षित मागणीला यश; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मिळणार डिजिटल कनेक्टिव्हिटीचा लाभ*

बांदा :

सह्याद्रीच्या दुर्गम भागातील घारपी आणि फुकेरी या गावांतील ग्रामस्थांची बहुप्रतीक्षित BSNL 4G मोबाईल टॉवरची मागणी अखेर पूर्ण झाली असून, परिसरातील BSNL 4G सेवा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर तोडगा निघाला असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मोबाईल नेटवर्कअभावी या भागातील नागरिकांना दैनंदिन संपर्कासोबतच विविध ऑनलाइन सेवांचा वापर करताना अडचणी येत होत्या. विशेषतः विद्यार्थ्यांना ऑनलाइन शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक व्हिडिओ, डिजिटल अभ्यासक्रम, ऑनलाइन परीक्षा व विविध शैक्षणिक उपक्रम यांचा लाभ घेण्यासाठी अडथळे येत होते. आता 4G सेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची दारे अधिक खुली होणार असून, दुर्गम भागातील शिक्षणाला त्याचा मोठा हातभार लागणार आहे.
तसेच शासकीय ऑनलाइन सेवा, बँकिंग व्यवहार, आरोग्यविषयक संपर्क, डिजिटल व्यवहार आणि विविध महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेणे ग्रामस्थांना सुलभ होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
घारपी व फुकेरी ग्रामस्थांच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. या कामासाठी सहकार्य करणारे केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोदजी कामत, दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा चिटणीस सुधीर दळवी तसेच BSNLचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या घारपी आणि फुकेरी या दुर्गम गावांना डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारे हे पाऊल ठरले असून, BSNL 4G सेवेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसह ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनालाही मोठी सुविधा मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा