मळेवाड जि. प. मतदारसंघात जास्तीत जास्त बंधारे व वनराई बंधारे उभारण्यासाठी प्रयत्न करणार
सावंतवाडी / मळेवाड : मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमध्ये भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांनी व्यक्त केले.
मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी जास्तीत जास्त बंधारे उभारण्याची गरज असून, यासाठी आतापासूनच ठोस पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांनी केले.
पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून समुद्राला मिळण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरविण्यासाठी बंधारे, छोटे नालेबंधारे तसेच जलसंधारणाची विविध कामे हाती घेणे गरजेचे आहे. यामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत होऊन शेतीसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होऊ शकते.
वाढती लोकसंख्या, बदलते हवामान आणि अनियमित पावसाचे प्रमाण पाहता भविष्यात पाण्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. त्यामुळे केवळ टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजच दीर्घकालीन नियोजन करून आवश्यक ठिकाणी बंधारे उभारण्यावर भर दिला पाहिजे.
यासाठी ग्रामपंचायती, जलसंधारण विभाग व संबंधित यंत्रणेने समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात जलसंधारणाची कामे करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असून, पाणी अडविण्यासाठी जास्तीत जास्त कामे तसेच वनराई बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अपर्णा सातोसकर यांनी दिली.
