You are currently viewing गणेशोत्सव… परंपरेचा, आपुलकीचा आणि नव्या जाणिवांचा उत्सव!

गणेशोत्सव… परंपरेचा, आपुलकीचा आणि नव्या जाणिवांचा उत्सव!

गणेशोत्सव… परंपरेचा, आपुलकीचा आणि नव्या जाणिवांचा उत्सव!

सिंधुदुर्ग म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निळाशार समुद्र, हिरवीगार डोंगररांग, लाल मातीची वाट, कौलारू घरे, अंगणातली तुळस आणि माणसांच्या मनात जपलेली आपुलकी. या भूमीच्या सांस्कृतिक जीवनात अनेक सण-उत्सवांना विशेष स्थान आहे; मात्र गणेशोत्सवाची गोष्ट काही वेगळीच आहे. कारण इथे गणपती म्हणजे केवळ देवघरात विराजमान होणारी मूर्ती नाही, तर घराला पुन्हा घरपण देणारा, माणसांना पुन्हा एकत्र आणणारा आणि गावाला पुन्हा जिवंत करणारा उत्सव आहे.

श्रावण सुरू झाला की कोकणात गणेशोत्सवाची चाहूल लागते. घरांची साफसफाई सुरू होते, मखराची तयारी होते, अंगण सजते, बाजारपेठा गजबजतात आणि दूरवर नोकरी-व्यवसायासाठी गेलेल्या माणसांच्या परतीची वाट पाहिली जाते. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई किंवा राज्याच्या इतर भागांत राहणारा कोकणवासी गणपतीसाठी आपल्या गावच्या घराकडे परततो. वर्षभर दूर असलेली भावंडे, नातेवाईक, मित्रमंडळी पुन्हा एकत्र येतात. सिंधुदुर्गाच्या गणेशोत्सवाचे हेच कदाचित सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे—बाप्पा येतो आणि माणसं जवळ येतात.

सिंधुदुर्गातील गणेशोत्सव हा म्हणूनच श्रद्धेबरोबरच कुटुंब, गाव आणि परंपरेचा उत्सव आहे. जिल्ह्यातील सांस्कृतिक परंपरांमध्ये गणेशचतुर्थीला महत्त्वाचे स्थान असून भजन, फुगड्या आणि विविध लोककला या उत्सवाशी जोडलेल्या आहेत. गावागावांत गणेशोत्सवाच्या काळात वातावरण भक्तिमय करणाऱ्या भजनांच्या तालमी आधीपासून सुरू होतात. अभंग, गौळणी, गजर आणि पारंपरिक वाद्यांचा नाद उत्सवाला वेगळीच रंगत देतो.

या परंपरेत आपल्या मातीचा सुगंध आहे. घरगुती गणपती, गौरीचे आगमन, आरती, नैवेद्य, मोदक, भजन, फुगड्या, नातेवाईकांच्या भेटीगाठी, लहान मुलांचा उत्साह, आजी-आजोबांच्या आठवणी आणि गावच्या मंडळींचे सामूहिक नियोजन—या सगळ्यांनी मिळून सिंधुदुर्गाचा गणेशोत्सव आकार घेतो. कुठे घरातील ज्येष्ठ व्यक्ती परंपरा सांगते, कुठे आई किंवा आजी मुलांना नैवेद्याची पद्धत शिकवते, तर कुठे तरुण मंडळी सजावट, आयोजन आणि डिजिटल माध्यमांची जबाबदारी सांभाळतात. अशा प्रकारे प्रत्येक पिढी आपापल्या पद्धतीने उत्सवात सहभागी होते.

राज्य शासनाच्या वतीने आता गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचे स्वरूप देण्यात आले असून त्यानिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्याची संकल्पना पुढे आली आहे. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, गणेशोत्सवाशी संबंधित रील्स व डिजिटल उपक्रम, प्रमुख गणेशस्थळांचे ऑनलाइन दर्शन आणि विविध क्षेत्रांतील स्थानिक सहभागाला प्रोत्साहन देण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.

या सगळ्या उपक्रमांचा अर्थ उत्सव मोठा, भव्य किंवा खर्चिक करणे एवढाच नाही. उलट, आपली परंपरा जपत उत्सव अधिक अर्थपूर्ण कसा करता येईल, हा त्यामागचा खरा विचार आहे.

गणेशोत्सव मंडळांनी यंदा आपल्या परिसरातील पारंपरिक कला आणि स्थानिक संस्कृतीला सजावटीचा आणि कार्यक्रमांचा केंद्रबिंदू बनवावे. सिंधुदुर्गची दशावतार लोककला, स्थानिक हस्तकला, पारंपरिक वाद्ये, कोकणी-मालवणी संस्कृती, गावचा इतिहास, स्थानिक देवस्थाने, किल्ले, लोकपरंपरा अशा विषयांवर देखावे, प्रदर्शन, कथाकथन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येतील. सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक ओळखीत दशावताराबरोबर चित्रकथी, गंजिफा, कोळीनृत्य आणि विविध ग्रामपरंपरांना महत्त्व आहे.

मुलांसाठी गणपती म्हणजे आनंदाचा सण. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा उत्सव घडविणे ही मोठ्यांची जबाबदारी आहे. शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा, गणेशोत्सवावरील चित्रकला, निबंध, वक्तृत्व, कथाकथन, पारंपरिक खेळ, प्रश्नमंजुषा किंवा स्थानिक इतिहासावर आधारित उपक्रम घेता येतील. तरुणांसाठी डिजिटल डिझाइन, रील्स, छायाचित्रण आणि माहितीपट निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देता येतील. ज्येष्ठ नागरिकांकडून गावच्या गणेशोत्सवाच्या जुन्या आठवणी ऐकून त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविता येतील. गणेशोत्सव म्हणजे फक्त मनोरंजन नव्हे; तो पिढ्यांना जोडणारा सांस्कृतिक दुवा आहे.

यंदा या दुव्याला पर्यावरणाची जोड देऊया. बाप्पाच्या स्वागतासाठी शाडू मातीची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती निवडणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, नैसर्गिक साहित्याने सजावट करणे, निर्माल्य वेगळे संकलित करणे आणि शक्य तिथे पर्यावरणपूरक विसर्जनाची व्यवस्था करणे, हे प्रत्येक घर आणि मंडळाला सहज शक्य आहे. फुले, पाने, नारळाच्या झावळ्या, बांबू, कापड, कागद, माती आणि स्थानिक उपलब्ध साहित्य वापरून केलेली सजावट ही दिसायलाही सुंदर असते आणि आपल्या मातीतल्या परंपरेशीही जोडलेली असते.

विसर्जन हा भावनेचा क्षण आहे. त्यामुळे तो तितक्याच जबाबदारीने साजरा करणे गरजेचे आहे. जलस्रोत स्वच्छ राहावेत, पाण्याला आणि निसर्गाला हानी पोहोचू नये, निर्माल्य पाण्यात न टाकता स्वतंत्रपणे संकलित करावे, याची काळजी घेऊया. आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर करणे, हा देखील पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, निर्माल्य संकलन, पुनर्वापर आणि प्लास्टिकमुक्त उत्सवासाठी व्यापक जनजागृती करण्याची दिशा यंदाच्या उपक्रमांमध्येही अधोरेखित करण्यात आली आहे.

ऊर्जेची बचत हा देखील उत्सवाचा एक सुंदर संकल्प होऊ शकतो. सजावटीसाठी दिवसभर अनावश्यक विद्युत रोषणाई ठेवण्याऐवजी गरजेपुरतीच रोषणाई, एलईडी दिव्यांचा वापर, शक्य असल्यास सौरऊर्जेवर आधारित सजावट आणि वेळेचे नियोजन यामुळे उत्सवाचा आनंद कमी होत नाही; उलट जबाबदार उत्सवाची नवी ओळख निर्माण होते. ऊर्जा बचतीचा संदेश देणारा गणेशोत्सव ही पुढच्या पिढीसाठीची चांगली शिकवण ठरेल.

उत्सव हा समाजाला जोडण्यासाठी असतो. म्हणून मंडळांच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक बचत गट, कारागीर, कलाकार, शेतकरी, लघुउद्योजक आणि स्थानिक उत्पादनांना स्थान देता येईल. गणेशमूर्ती, मखर, सजावट, पूजासाहित्य, पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला किंवा स्थानिक कलाकृती यांना प्रोत्साहन दिल्यास उत्सवाचा आनंद गावच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावू शकतो. महिलांच्या बचत गटांना स्थानिक खाद्यपदार्थ किंवा प्रसादाच्या उपक्रमात सहभागी करून घेता येईल. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणे म्हणजे आपल्या संस्कृतीला पुढे नेणे होय. अशा स्थानिक सहभागाची दिशाही प्रस्तावित उपक्रमांमध्ये आहे.

आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे उत्सवातील प्रत्येकाचा सहभाग. एखाद्या मंडळाचा उत्सव केवळ काही कार्यकर्त्यांचा न राहता तो संपूर्ण परिसराचा उत्सव व्हावा. ज्येष्ठांसाठी सांस्कृतिक मैफल, महिलांसाठी पारंपरिक खेळ किंवा कौशल्य प्रदर्शन, मुलांसाठी सर्जनशील उपक्रम, तरुणांसाठी क्रीडा व डिजिटल स्पर्धा आणि सर्वांसाठी सामूहिक आरती, भजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम उत्सवाला सर्वसमावेशक बनवू शकतात. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि गरजूंसाठी मदत अशा छोट्या उपक्रमांमधून उत्सवाचे सामाजिक रूप अधिक सुंदर करता येईल.

यंदा उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेतही मोठ्या उत्साहाने सहभागी होऊया. ही स्पर्धा केवळ सजावट किंवा देखाव्याची नसून उत्सव कसा साजरा केला, परंपरा किती जपली, समाजाचा सहभाग किती वाढविला, पर्यावरणाची काळजी किती घेतली आणि उपक्रमांमधून किती सकारात्मक संदेश दिला, याचेही एक सुंदर व्यासपीठ बनू शकते.

आजच्या डिजिटल युगात आपल्या गावचा गणपती जगभर पोहोचविण्याची संधीही प्रत्येकाच्या हातात आहे. यासाठी रील्स, छायाचित्रण आणि डिजिटल उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची कल्पनाही पुढे आली आहे. मात्र डिजिटल उत्साहात प्रत्यक्ष उत्सवाचा आत्मा हरवता कामा नये. मोबाईलच्या कॅमेऱ्याआडून बाप्पाकडे पाहण्यापेक्षा काही क्षण मोबाईल बाजूला ठेवून आरतीत सहभागी होणे, आजी-आजोबांशी गप्पा मारणे, मुलांसोबत प्रसाद वाटणे आणि शेजाऱ्यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेणे—या छोट्या गोष्टीच तर या उत्सवाला खरेपण देतात.

सिंधुदुर्गचा गणेशोत्सव मुळातच माणसांचा उत्सव आहे. लाल मातीच्या अंगणातला बाप्पा शहरातल्या उंच इमारतीत राहणाऱ्यालाही आपलासा वाटतो आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या छोट्याशा घरात राहणाऱ्यालाही. इथे बाप्पासोबत येते ती माणसांची ऊब. गावात उत्सवाला आलेला कोकणवासी, घरातली लगबग, शेजारच्या             काकूंचा प्रसाद, मित्रमंडळींच्या भेटी, रात्रीची भजनाची मैफल, मुलांचे खेळ आणि विसर्जनाच्या वेळी डोळ्यांत दाटणारी भावना—या सगळ्यांनी गणेशोत्सवाची एक स्वतंत्र कोकणी ओळख निर्माण केली आहे.

ही ओळख जपायची आहे. मात्र जतन म्हणजे परंपरेला जशीच्या तशी बंदिस्त ठेवणे नव्हे. परंपरेचा आत्मा कायम ठेवत तिच्यात काळानुरूप चांगल्या गोष्टींची भर घालणे, हीच खरी सांस्कृतिक समृद्धी आहे.

म्हणून यंदा बाप्पाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करूया. स्थानिक कला जपूया. आपल्या गावच्या कलाकारांना संधी देऊया. मुलांना आपल्या संस्कृतीशी जोडूया. ज्येष्ठांच्या आठवणी जतन करूया. पर्यावरणाची काळजी घेऊया. पाण्याचे आणि विजेचे महत्त्व समजून घेऊया. प्लास्टिकला नकार देऊया. निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करूया. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊया. उत्कृष्ट गणेशोत्सवाच्या स्पर्धेत सहभागी होऊया. आणि आपल्या उत्सवातून असा संदेश देऊया की आनंदासाठी निसर्गाला किंमत मोजावी लागत नाही.

गणेशोत्सवाच्या काळात विविध श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक भावना आपल्या आसपास नांदत असतात. त्यामुळे आपल्या आनंदासोबत इतरांच्या श्रद्धांचा आणि भावनांचा आदर राखणे हीदेखील उत्सवाचीच संस्कृती आहे. संयम, परस्पर सन्मान, आपुलकी आणि सलोखा यामुळे उत्सवाचा आनंद अधिक खुलतो. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची जाणीव ठेवून आनंद साजरा केला तर आपल्या उत्सवाची उंची आणखी वाढेल.

बाप्पा आपल्याला बुद्धी, विवेक आणि सद्भावनेचा आशीर्वाद देतो, असे आपण मानतो. मग यंदाचा उत्सवही त्याच मूल्यांना साजेसा का नसावा?

आनंद असू दे, पण त्याला संवेदनशीलतेची साथ असू दे.

उत्साह असू दे, पण त्याला शिस्तीची जोड असू दे.

परंपरा असू दे, पण त्यासोबत नव्या पिढीची सर्जनशीलता असू दे.

सजावट असू दे, पण निसर्गाची किंमत मोजून नव्हे.

रोषणाई असू दे, पण ऊर्जेची उधळपट्टी नको.

उत्सव असू दे, पण त्यात प्रत्येकाचा सहभाग असू दे.

सिंधुदुर्गच्या लाल मातीतील हीच आपली गणेशोत्सवाची खरी ओळख—भक्ती, परंपरा, कुटुंब, गाव, कला, निसर्ग आणि माणुसकी यांना एकत्र आणणारा उत्सव.

यंदा बाप्पाचे स्वागत अशाच समृद्ध भावनेने करूया.

गणपती बाप्पा मोरया!

 

लेखक- सचिन अडसूळ,

जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग

– ९०४९९८७२९८/७०२०२८१३७०

प्रतिक्रिया व्यक्त करा