You are currently viewing कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाईफ’चे आलिशान हॉटेल साकारणार

कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाईफ’चे आलिशान हॉटेल साकारणार

कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाईफ’चे आलिशान हॉटेल साकारणार

५० खोल्यांच्या हॉटेलचे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन; सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मिळणार नवी चालना

देवगड :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील करार आज मंत्रालयातील दालनात करण्यात आला. या प्रकल्पामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
कुणकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या या आलिशान हॉटेलमध्ये ५० खोल्या असणार असून, प्रकल्पाचे काम अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सिंधुदुर्गमध्ये शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथे ताज हॉटेल साकारत असल्याने जिल्ह्यातील पर्यटन सुविधांमध्ये आणखी भर पडणार आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या तसेच विविध व्यवसायांच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासही हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा