You are currently viewing मायभूमी…!
Oplus_16908288

मायभूमी…!

*सूरमयी साहित्य समूहाचे सन्मा सदस्य कवी जोतिबा पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मायभूमी…!*

 

मायभूमीच्या मातीमध्ये

अनेक रत्नांची खाण,

संस्कृतीचा अमोल वारसा

तिला जगभरात मान…!

 

संत महंत अन् वीरांची

ही पवित्र भूमी महान,

मातीच्या कणाकणामध्ये

वसतो भारताचा अभिमान…!

 

पारतंत्र्याच्या काळोखातही

स्वातंत्र्याचा घेतला ध्यास,

सत्याची कास हाती घेऊन

माणुसकीचा जपला श्वास…!

 

रक्तामधली उसळती ज्वाला

बलिदानाची पेटली मशाल,

हसतच प्राण अर्पून वीरांनी

मोडीला गुलामीचा जाळ…!

 

इतिहास अजूनही सांगतो

त्या त्यागाची अमर कहाणी,

स्वातंत्र्याची पहाट उगवली

घेऊन सुख समृद्धीची वाणी…!

 

काळाच्या ओघामध्ये चित्र

हळूहळू येथे बदलत गेले,

स्वार्थाच्या सावलीखाली

माणुसकीचे रंग फिके झाले…!

 

शत्रू नाही सीमारेषेवर

तरी बंधने कितीतरी आहेत,

विचारांच्या या बेड्यांमध्ये

स्वतःला अडकवित आहेत…!

 

जात,धर्म, स्वार्थ मतभेदांनी

मने आपापल्यात दुभंगली,

माणुसकीच्या सुंदर वाटेवर

अविश्वासाची सावली पडली…!

 

मायभूमीची लेकरे आम्ही

कुठे चुकलो, कुठे हुकलो?

इतिहास माहीत असूनही

चुका पुन्हा करत चाललो?

 

आता वेळ पुन्हा जागण्याची

बोध इतिहासातून घेण्याची,

त्याग,सत्य व मानवतेची

ज्योत अंतरी पेटवण्याची…!

 

नको देशभक्ती शब्दातूनी

कर्मातून तिचा मान हवा,

नको स्वातंत्र्य श्वासातमध्ये

विचारांनाही मार्ग मोकळा हवा…!

 

भेद विसरून हातात हात

माणुसकीचा धर्म जपूया,

ज्या वीरांनी पाहिले स्वप्न

एकजुटीने ते साकारूया…!

 

मायभूमीची घेऊन शपथ

सत्याची कास धरूया,

स्वार्थाच्या त्या अंधारातून

मानवतेचा दीप उजळूया…!

 

अभिमानाने गान गाऊ

आम्ही तिची खरी लेकरे,

याच मातीत सांडले रक्त

त्या भूमीचे आम्ही वारस खरे…!

 

मायभूमी तू धन्य आमुची

तुझा सदैव राहो जयगान,

मातीचा कणकण सांगतो

माणुसकी हाच खरा हिंदुस्थान…!

 

स्वच्छंद पाखरू…!

जोतिबा पाटील,

किटवाड. चंदगड, कोल्हापूर

प्रतिक्रिया व्यक्त करा