*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आला श्रावण श्रावण…*
आला श्रावण श्रावण
भरले हो माझे मन
सया आल्या हो सोबती माझे भरले अंगण..
कशा किलबिलती त्या
सारे मनीचे बोलती
कोंडलेली सारी भुते
मनातली गणगण..आला श्रावण श्रावण…
गौरी गणपती सण
माहेरचे गणगोत
सारे आठवते मनी
काकणांची किणकिण.. आला श्रावण श्रावण..
आमराई आठवते
झोका झुलवत येते
भाऊरायासाठी राखी
किती पवित्र बंधन.. आला श्रावण श्रावण…
दाराआडून पाहते
साजणाच्या हालचाली
आता मंगळागौरीला
काय देईल आंदण.. आला श्रावण श्रावण…
हिरवाई नवलाई
फुले पांघरून आली
मन हुरहुर करे
कसं फुलतं चांदणं.. आला श्रावण श्रावण..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
