डॉ. दीपक परब यांचे निवेदन; ऐतिहासिक ‘मसुरे’ नाव कायम ठेवण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा होणार
मालवण / प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतीचे नाव बदलून ‘मसुरे मर्डे’ करण्यात यावे, अशी मागणी मसुरे ग्रामविकास संघ, मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे कणकवली येथे निवेदनाद्वारे केली. यावर ग्रामविकास विभागामार्फत सकारात्मक निर्णयासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्याची माहिती डॉ. परब यांनी दिली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मसुरे-डांगमोडे ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर शासनाने ग्रामपंचायतीचे नाव ‘मर्डे’ असे केले. मात्र, याबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून कोणतीही मागणी करण्यात आलेली नव्हती. उलट विभाजनाच्या वेळी मूळ ग्रामपंचायतीचे नाव बदलू नये, असा ठराव ग्रामसभेने मंजूर केला होता. तरीही प्रशासकीय स्तरावरील निष्काळजीपणामुळे ‘मसुरे’ हे ऐतिहासिक नाव वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डॉ. परब यांनी सांगितले की, कांदळगाव आणि कोळंब ग्रामपंचायतींच्या विभाजनावेळी मूळ नाव कायम ठेवण्यात आले होते. मात्र, मसुरेच्या बाबतीत वेगळा निर्णय घेतल्याने गावावर अन्याय झाला आहे. पोस्ट ऑफिस, महसूल विभाग, निवडणूक ओळखपत्र तसेच जिल्ह्याच्या अधिकृत नकाशावर आजही ‘मसुरे’ हेच नाव असून ग्रामपंचायतीचे नाव ‘मर्डे’ असल्याने नागरिकांना विविध प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
‘मसुरे’ या नावाशी गावाचा ऐतिहासिक वारसा, अस्मिता आणि भावनिक नाते जोडलेले आहे. इंग्रजकालीन ‘मशहूरा’ या नावाचा अपभ्रंश होऊन ‘मसुरे’ हे नाव प्रचलित झाल्याची आख्यायिका असून, पूर्वी जलमार्गावरील व्यापारी केंद्र म्हणून गावाची ओळख होती. त्यामुळे हे ऐतिहासिक नाव कायम राहावे, अशी ग्रामस्थांची भावना असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही संबंधित मंत्री, कोकण विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांदरम्यानही ‘मसुरे मर्डे’ असा उल्लेख मतदार यादीत करण्यात आला होता. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी ग्रामस्थांनी बहिष्काराचा इशाराही दिला होता. त्यावेळी प्रशासनाने नावाच्या प्रश्नावर सहकार्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतला होता. मात्र, अद्यापही प्रश्न प्रलंबित असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, भेटीदरम्यान परब सहकारी पतपेढीच्या वतीने अध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार केला. यावेळी भाई परब, शैलेंद्र परब आणि सुजित परब उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी पतपेढीच्या विविध उपक्रमांची, सदस्यसंख्येची, कर्जवसुलीचे प्रमाण, शाखा आणि एकूण नफ्याची माहिती घेत पतपेढीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतानाच कर्जवसुलीचे प्रमाण वाढविण्याचा सल्लाही दिला.
