You are currently viewing इन्सुली खामदेव नाका येथील नव्या बॉक्सवेल उड्डाणपुलाला तडे; निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक

इन्सुली खामदेव नाका येथील नव्या बॉक्सवेल उड्डाणपुलाला तडे; निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक

इन्सुली खामदेव नाका येथील नव्या बॉक्सवेल उड्डाणपुलाला तडे; निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक

२५ ते ३० कोटींच्या पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; चार दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

बांदा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे सुमारे २५ ते ३० कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आलेल्या बॉक्सवेल उड्डाणपुलाला तसेच लगतच्या सर्व्हिस रोडला मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद राणे व इन्सुली ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता वृषाली पाटील यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पावसाचा जोर कमी असतानाही पुलाचा भराव खचला असून संबंधित ठेकेदाराकडून गंभीर त्रुटी दूर करण्याऐवजी डांबर व सिमेंट टाकून केवळ मलमपट्टी केली जात आहे. या निकृष्ट कामामुळे पुलावरून सुरू असलेली हजारो वाहनांची वाहतूक धोकादायक बनली असून मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
निवेदनात, पुलाच्या कामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व देखरेख करणाऱ्या अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पुलाचे काम तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित नसल्यास वाहतूक तात्काळ बंद करून तज्ज्ञांकडून संपूर्ण पुलाची व सर्व्हिस रोडची योग्य दुरुस्ती करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यास त्याची कायदेशीर व नैतिक जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची की संबंधित ठेकेदाराची, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्य अभियंता वृषाली पाटील यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद राणे, हेमंत नाईक, सिद्धेश मोरजकर, नचिकेत सावंत यांच्यासह इन्सुली ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, पुढील चार दिवसांत लेखी स्वरूपात समाधानकारक कारवाई न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा