आंबोलीत भव्य स्वच्छता वारी; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा प्रत्यक्ष सहभाग
‘जबाबदार पर्यटन’चा दिला संदेश; पर्यटक, ग्रामस्थ व प्रशासनाने मिळून स्वच्छतेचा घेतला संकल्प
आंबोली | प्रतिनिधी :
सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी स्वच्छता आणि जबाबदार पर्यटन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंबोली येथे आयोजित भव्य स्वच्छता मोहिमेत केले. ग्रामपंचायत आंबोली आणि ‘स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ही मोहीम उत्साहात पार पडली.
आंबोली घाट मार्गावरील ‘पूर्वीचा वस’ देवस्थान येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी स्वतः हातात कचऱ्याची पिशवी घेऊन स्वच्छतेत सहभाग घेतला. ‘पूर्वीचा वस’ ते आंबोली पोलीस चौकीपर्यंत कचरा संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी पर्यटकांना स्वच्छता आणि जबाबदार पर्यटनाचा संदेश देणारी पत्रकेही वाटण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, सिंधुदुर्गमध्ये दरवर्षी लोकसंख्येच्या तिप्पट पर्यटक येतात. त्यामुळे पर्यटनस्थळांची स्वच्छता राखण्याबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. स्वच्छता राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनीही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्वच्छता मिशन सिंधुदुर्गचे निमंत्रक गणेश जेठे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जिल्हाभर पर्यटन व्यवसाय वेगाने वाढत असून संपूर्ण सिंधुदुर्ग स्वच्छ करणे हे मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आंबोली ग्रामपंचायतीच्या प्रशासक व माजी सरपंच सावित्री पालेकर यांनी पर्यटनवाढीसोबत स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत शासनाकडून अधिक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
मोहिमेची सांगता राष्ट्रगीत आणि स्वच्छतेचा संकल्प करून करण्यात आली.
या स्वच्छता वारीत तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव, निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील, वनपाल सम्राट पाटील, पर्यटन व्यावसायिक, पोलीस, वनविभाग, ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच शेकडो ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
