You are currently viewing २६ जुलै रोजी सावंतवाडीत कारगिल विजय दिनानिमित्त प्रभात फेरी; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

२६ जुलै रोजी सावंतवाडीत कारगिल विजय दिनानिमित्त प्रभात फेरी; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

२६ जुलै रोजी सावंतवाडीत कारगिल विजय दिनानिमित्त प्रभात फेरी; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

आरपीडी हायस्कूलपासून प्रभात फेरी; माजी सैनिकांच्या मनोगताचा कार्यक्रमही होणार

सावंतवाडी : प्रतिनिधी

कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी २६ जुलै (रविवार) रोजी सावंतवाडी शहरात कारगिल विजय दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता आरपीडी हायस्कूल येथून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले असून, सैनिक, माजी सैनिक, देशप्रेमी नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभात फेरी आरपीडी हायस्कूल येथून सुरू होऊन मोती तलाव, गांधी चौक, श्रीराम वाचन मंदिर, राजवाडा, जगन्नाथराव भोसले गार्डन, कॉलेज रोड, रामेश्वर प्लाझा मार्गे पुन्हा आरपीडी हायस्कूल येथे समाप्त होणार आहे.
यानंतर आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात माजी सैनिक, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व देशप्रेमी नागरिक यांची मनोगते होणार असून, कारगिल युद्धातील शौर्यगाथा आणि देशभक्तीचा संदेश उपस्थितांना दिला जाणार आहे. या कार्यक्रमास शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देशप्रेमी राजेंद्र प्रभाकर मसूरकर तसेच जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी केले आहे.
यावेळी कारगिल युद्धात सहभागी झालेले ब्रिगेडियर तथा माजी खासदार सुधीर सावंत यांच्या देशसेवेचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. कारगिल युद्धाच्या काळात देशरक्षणासाठी त्यांनी बजावलेल्या कर्तव्याची आठवण करून देत त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात येणार आहे.
राजू मसूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या सहवासातून देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. गेली अनेक वर्षे त्यांच्याकडून मिळालेली ही शिकवण आपण जपत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा