You are currently viewing ३६५ दिवस महिला दिन राहूद्या…

३६५ दिवस महिला दिन राहूद्या…

 

महिला “दीन” नको…

आपल्या भारतीयांच्या जीवनात प्रत्येक दिवसाला एक महत्त्व असते.बालकांसाठी बालदिन,जेष्ठासाठी जेष्ठ नागरिक दिन तसा महिलासाठी महिला दिन.स्पष्ट सांगायच झालचं तर हा दिवस आपण महिलांच्या कल्याणकारी आणि सबलीकरणाच्या विविध कार्यक्रमाने साजरा करतो.

चुल आणि मुल या परंपरेनुसार बंदिस्त झालेल्या स्त्रियांच्या मर्यादा भेदण्याचं महत्त्वपूर्ण कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाईनी केलं आणि भारतीय स्त्री मोकळं श्वास घ्यायला घराच्या उंबरठ्या बाहेर पडली.स्रियांचे हक्क आणि सन्मान त्यांना मिळाला पाहिजे यासाठी विशेषतः  पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रीचळवळीला मुर्त रुप प्राप्त झालं.संशोधन, साहित्य, उद्योग, वैद्यकीय, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात आज आपल्या आमच्या माता भगीनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहे.कायद्यात तरतूद करुन राजकारणातही मिळालेली संधी हा सुद्धा स्रियांच्या सबलीकरणाच्या दिशेने घेतलेला योग्य निर्णय आहे.

अंतराळ संशोधन असो,आकाशात उंच भरारी घेणारी महिला असो.रेल्वेच्या इंजिनचं सारथ्य करणारी महिला असो..आज पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.भारतीय महिलांच्या कर्तृत्वाची चमकदार कामगिरी आपण अनुभवत असताना एक शल्य मात्र सतत वेदना देत आहे..

दिवसेंदिवस स्रियांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटना  सातत्याने घडतं आहेत.अजूनही निर्भयांचे बळी थांबलेले नाहीत.समाजातील विक्रुतीला आपण सगळ्यानीचं ठेचलं पाहिजे. उमलणाऱ्या कोवळ्या कळ्यांचही आयुष्य उध्वस्त केल जात आहे.जर आपण संवेदनशीलतेने आणि एक सजग नागरिक म्हणून या अतीगंभीर विषयाकडे पाहिल तर अशा घटना टळू शकतात आणि आमच्या महिलांना दिलासा मिळू शकतो.महिलांच्या सुरक्षतेसाठी वेळोवेळी केलेले कायदे फक्त कागदावर न रहाता त्याची काटेकोरपणे अमंलबजावणी करणे गरजेचे आहे.महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्यासाठी फक्त महिलादिनी कार्यक्रम करून आणि त्या़चा एका दिवशी सन्मान करून त्यांना न्याय मिळणार नाही.महिलादिन हा ३६५ दिवस असला पाहिजे… नाहीतर दरवर्षी फक्त ८ मार्च हा माहिला “दीन”च राहिल.

माझ्या तमाम महिला माता- भगिनींना ३६५दिवसासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

….अँड.नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =