You are currently viewing किनळोस ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा; स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांचा आरोप

किनळोस ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा; स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांचा आरोप

किनळोस ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा; स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांचा आरोप

उपकार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन; १५ दिवसांत वीजबिलांची पडताळणी करून योग्य कारवाईचे आश्वासन

सिंधुदुर्गनगरी

किनळोस गावात बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ वीजबिले येत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी महावितरणच्या ओरोस येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. उपकार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर वाढीव वीजबिलांची पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन महावितरण प्रशासनाने दिले.
या आंदोलनात किनळोस येथील संजय सावंत, सखाराम परब, प्रकाश परब, रविकांत सावंत, मधुकर सावंत, बाळकृष्ण गावडे, अक्षय साटम, सदानंद ठुबरे, राजेंद्र सावंत, अमृत बागवे, वासुदेव सावंत यांच्यासह सुमारे ३० ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने स्मार्ट मीटरमुळे वाढलेली वीजबिले आणि इतर समस्यांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडली. गावातील अनेक ग्राहकांना अवास्तव वीजबिले मिळाल्याच्या तक्रारी असून त्याची तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावर उपकार्यकारी अभियंता राजेंद्र कामथे यांनी प्रत्येक वीजजोडणीचा पाच दिवसांचा वीजभार (लोड) डाटा तपासून पुढील १५ दिवसांत सखोल पडताळणी केली जाईल. पडताळणीत वाढीव वीजबिले आढळल्यास आवश्यक ती दुरुस्ती करून ग्राहकांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी ग्रामस्थांनी गावातील जीर्ण झालेले वीज खांब आणि धोकादायक अवस्थेतील विद्युत वाहिन्यांचाही प्रश्न उपस्थित केला. त्यानुसार पणदूर विभागाचे कनिष्ठ अभियंता पाटील यांना संबंधित ठिकाणी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा