आंबोलीत महादेवगड पॉईंटवरून ४०० फूट दरीत पर्यटक कोसळला
निपाणी येथील डॉ. आयुब सय्यद यांचा वर्षा पर्यटनादरम्यान भीषण अपघात; बचावकार्यासाठी यंत्रणा घटनास्थळी
आंबोली
आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील एका पर्यटकाचा महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे.
डॉ. आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसह मंगळवारी सकाळी आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी महादेवगड पॉईंट परिसरात असताना ते लघुशंकेसाठी सुरक्षेच्या रेलिंगच्या पलीकडे गेले. त्यावेळी अचानक तोल गेल्याने ते थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले.
घटनास्थळी मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्याने तात्काळ डॉ. सय्यद यांच्या सहकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस व स्थानिक बचाव पथकाला याबाबत कळविण्यात आले असून पुढील बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे महादेवगड पॉईंट परिसरात काही काळ खळबळ उडाली.
