You are currently viewing गिरीजा राऊत प्रकरणी भाजप महिला मोर्चा आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

गिरीजा राऊत प्रकरणी भाजप महिला मोर्चा आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

गिरीजा राऊत प्रकरणी भाजप महिला मोर्चा आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांची पत्रकार परिषद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून निवेदन देणार

ओरोस | प्रतिनिधी :
माजी खासदार विनायक राऊत तसेच नगरसेवक गिरीश राऊत यांनी सौ. गिरीजा राऊत यांच्याशी अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी दिली.

ओरोस येथील वसंत स्मृती भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस आदिती सावंत, जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील आणि सुप्रिया वालावलकर उपस्थित होत्या.

श्वेता कोरगावकर म्हणाल्या की, राज्यात महिलांच्या सन्मानासाठी शासन कटिबद्ध असताना एका लोकप्रतिनिधीच्या घरातील महिलेला न्यायासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणे ही गंभीर बाब आहे. संबंधित महिलेवर अघोरी विद्या व जादूटोण्याचे प्रयोग झाल्याचे आरोप समोर आले असून या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असल्याने या प्रकरणात कायद्याने योग्य ती कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावे, तसेच पोलिसांनीही या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील जादूटोणा, अघोरी प्रकार आणि भोंदूगिरीच्या घटनांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

महिला ही कुटुंबाचा आधारस्तंभ आणि समाजाच्या प्रगतीचा मजबूत पाया आहे. त्यामुळे महिलांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक छळासह अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला समाजाने ठाम विरोध करून न्याय, समानता आणि सन्मानाची संस्कृती रुजविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही कोरगावकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा