वैश्य भवनातील खासगी कंपनीच्या कामाला धर्मादाय आयुक्तांची स्थगिती
समाज बांधवांच्या तक्रारीची दखल; पुढील आदेशापर्यंत कोणतेही काम न करण्याचे निर्देश
सावंतवाडी
येथील वैश्य भवन इमारतीमध्ये सुरू होत असलेल्या एका खासगी कंपनीच्या नव्या कार्यालयाच्या कामाला कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्तांनी तूर्तास स्थगिती दिली आहे. पुढील निर्णय होईपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले असून, त्याबाबतचे पत्रही जारी करण्यात आले आहे. वैश्य समाज बांधवांच्या एका गटाने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला.
या संदर्भातील माहिती उद्योजक रमेश भाट, अमित गावंडळकर, पुष्पलता कोरगावकर, संतोष मुंज, अरुण भिसे, आनंद नेवगी आणि शुभांगी सुकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैश्य भवनातील हॉल एका खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यास समाजातील एका गटाचा विरोध होता. असे असतानाही रमेश बोंद्रे आणि बाळ बोर्डेकर यांनी संबंधित कंपनीसोबत करार करून कामाला सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात समाज बांधवांनी कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर आयुक्तांनी कामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले.
उद्योजक रमेश भाट यांनी सांगितले की, समाज बांधवांना विश्वासात न घेता आणि अधिकृत ट्रस्टी नसताना इमारत भाड्याने देण्यात आली. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागण्यात आली होती. आता पुढील आदेश येईपर्यंत वैश्य भवन इमारतीसंदर्भातील सर्व अधिकार धर्मादाय आयुक्तांकडे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनधिकृत भाडेकरार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अरुण भिसे यांनी सांगितले की, हा वैश्य समाजाचा अंतर्गत विषय असल्याने समाजाची प्रतिमा जपण्यासाठी आतापर्यंत संयम बाळगला होता. मात्र सातत्याने चुकीच्या घडामोडी होत असल्याने अखेर समाज बांधवांनी एकत्र येत या विरोधात आवाज उठवला.
यावेळी तनुजा पोकळे, जयेश स्वार, अवधूत नार्वेकर, शैलेश गावंडळकर, मुन्ना कोरगावकर, शंभू विरणोडकर, संजय नार्वेकर, अण्णा म्हापसेकर, नाना गावंडळकर, सुनील मिसाळ, सुदेश नेवगी, हर्षद पोकळे, कपिल कोरगावकर, प्रतिक कोरगावकर, श्रेयस मुंज, ऋतिक कोरगावकर, पल्लवी स्वार, सत्यवान बांदेकर, नित्यानंद कोरगावकर, तुषार कोरगावकर यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
