ॲड. अनिल निरवडेकर यांचा युक्तिवाद
सावंतवाडी : तरुणीचा विनयभंग करून गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपाखालील बाबलो शंकर वरक (रा. कोनशी-टेंबवाडी, ता. सावंतवाडी) याची ओरोस येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणात ॲड. अनिल निरवडेकर यांनी बचाव पक्षाची बाजू मांडली.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, २२ मे २०२३ रोजी सायंकाळी सुमारे ४.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुणी तिच्या घराजवळील बागेतील झाडांना पंपाने पाणी लावत होती. अचानक पंपाचे पाणी बंद झाल्याने ती नदीकाठावरील पंपाची पाहणी करण्यासाठी गेली. नदीतील पाणी कमी झाल्याने पंप बंद पडल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पंप बंद केला आणि सायंकाळी सुमारे ५.०० वाजता निर्जन पायवाटेने ती परत घरी येत होती.
त्यावेळी आरोपी बाबलो वरक याने तिचा उजवा हात धरून स्वतःकडे ओढत विनयभंग केल्याचा आरोप होता. फिर्यादीने हिसका मारून हात सोडविल्यानंतर ती जमिनीवर पडली व तिने आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपीने डाव्या हाताने तिचे तोंड दाबले आणि उजव्या हाताने गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. या झटापटीत तिच्या गळ्यावर नखांचे ओरखडे येऊन ती जखमी झाली. फिर्यादी बेशुद्ध पडल्याने ती मृत झाल्याचे समजून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले.
बराच वेळ मुलगी घरी न आल्याने तिचे वडील तिचा शोध घेण्यासाठी गेले असता ती धडपडत येताना दिसली. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने प्रथम तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर सावंतवाडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०७ व ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून ओरोस येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी ओरोस येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. मात्र सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या जबाबांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती व तफावत आढळून आली. त्यामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही.
परिणामी, सबळ पुराव्यांचा अभाव आणि बचाव पक्षाचा कायदेशीर युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने बाबलो शंकर वरक यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीच्या वतीने मुख्य वकील म्हणून ॲड. अनिल निरवडेकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. गणेश चव्हाण, प्रितेश गावस, दत्तप्रसाद ठाकूर, केतन जाधव आणि वामन गावस यांनी सहकार्य केले.
