सावंतवाडीतील ३३ केव्ही वीजवाहिन्या भूमिगत करा; आमदार दीपक केसरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने मंजुरी व निधीची मागणी
सावंतवाडी :
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ३३ केव्ही वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या कामास तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
९ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला असला, तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ व जंगल परिसरात दरवर्षी मुसळधार पावसामुळे झाडे कोसळून वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान होते. परिणामी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी लोखंडी पोल, फॅब्रिकेशन तसेच जुन्या वीजतारांची दुरवस्था झाल्याने ही समस्या अधिक गंभीर बनल्याचेही पत्रात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ३३ केव्ही वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या कामास तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केसरकर यांनी केली आहे.
या मागणीची पूर्तता झाल्यास पावसाळ्यातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंड राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
