शिरोडा बाजारपेठेत डासांचा वाढता प्रादुर्भाव; फॉगिंगसह तातडीच्या उपाययोजनांची नागरिकांची मागणी
गटारांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला; ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा
शिरोडा :
शिरोडा बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या घातक आजारांचा धोका वाढू नये आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे, यासाठी शिरोडा ग्रामपंचायत व सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बाजारपेठेतील नागरिकांकडून होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि बदलत्या हवामानामुळे डासांची संख्या लक्षणीय वाढली आहे. विशेषतः शिरोडा बाजारपेठ व भाजी मार्केट परिसरातील गटारांमध्ये घाण पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे डेंग्यू व मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांची भीती नागरिकांना सतावत आहे.
या पार्श्वभूमीवर शिरोडा ग्रामपंचायत आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने बाजारपेठ, भाजी मार्केट तसेच गटारांमध्ये तातडीने जंतुनाशक फवारणी व फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करावी. तसेच साचलेले पाणी, गटारांची स्वच्छता आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवावे, अशी जोरदार मागणी शिरोडा बाजारपेठेतील नागरिकांनी केली आहे.
