You are currently viewing स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न

स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न

सिंधुदुर्ग :

 

मराठी वाचकांसाठी, रसिकांसाठी दिवाळी अंक म्हणजे साहित्याची मेजवानीच. मराठी माणूस दिवाळी अंकाची उत्सुकतेने वाट पहात असतो. असा हा दिवाळी अंक फक्त एका स्पर्शाने तुमच्या समोर साकार होणार असेल तर!! तर मग मराठी माणसाला होणारा आनंद काय वर्णावा?

रेणुका आर्टस् निर्मित स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक, २०२२ (वर्ष तिसरे) चा प्रकाशन सोहळा दिनांक २१ ऑक्टोबर, २०२२ रोजी दिवाळीच्या आगमनाच्या मुहूर्तावर झूमवर ऑनलाईन पद्धतीनेच मान्यवर अतिथी ज्येष्ठ श्रेष्ठ विश्वप्रसिद्ध ‘रेग्युलस तारा’ या पदवीने सन्मानित साहित्यिक सर डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते पार पडला. प्रकाशन सोहळ्याची सुरूवात रेणुका इंगळे हिने गायलेल्या सुश्राव्य अशा सरस्वती वंदनेने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. रेणुका आर्टस्’च्या सर्वेसर्वा आसावरी इंगळे यांनी प्रास्ताविकरूपी मनोगतात स्पर्श या दिवाळी संकल्पनेबद्दल सांगितले.

‘ग्रंथ तुमच्या दारी’ या चळवळीचे शिल्पकार मान्यवर श्री. विनायक रानडे सरांनी प्रत्यक्ष हा दिवाळी अंक कसा पहावा व ऐकावा याचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे दिवाळीच्या काळात कुठेही नेता येईल व आनंद घेता येईल असा हा लेखन साहित्य व कला यांचा सुंदर संगम असलेला आगळावेगळा अंक आपल्या दारी येत आहे ही एक मोठी पर्वणीच आहे, या शब्दांत अंकाचे स्वागत केले. डाॅ. मधुसूदन घाणेकरांनीही आपले मनोगत एका वेगळ्या संगीतमय भाषणाने व त्यानंतर सादर केलेल्या शीळवादनाने करून अजूनच कार्यक्रमाची शोभा वाढवली. असा अंक त्यांनी प्रथमच पाहिला असल्याचे सांगून हा साहित्य व कलेला, प्रत्येक भावनेला स्पर्शिणारा हा अंक हृदयस्पर्शी अंक आहे, असेही ते बोलले. काही साहित्यिकांनी अंकाबद्दल मोजकीच पण अतिशय छान मनोगतं मांडली व ते आपणही या दिवाळी अंकाचे घटक आहोत हे अभिमानाने सांगत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमाताई नागपूरकर तर रेखा तांबे यांनी आभार प्रदर्शन केले.

स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक हा मराठी साहित्य क्षेत्रातील प्रथम ऑडियो व्हिज्युअल अंक असून यात एका क्लिकवर उघडणारे कथा, लेख, कविता, बालकथा,बालकविता तर आहेतच, ज्या आपण वाचू शकतो आणि लेखकांच्याच आवाजात ऐकूदेखील शकतो! याशिवाय गायन विभाग व सुंदर कलाकृतींनी सजलेले कलाविभाग देखील आहेत!

या लिंकवर क्लिक केल्यास अंक सहज वाचता येऊ शकतो. येत्या २-३ दिवसात हा अंक बुकगंगावरदेखील उपलब्ध करण्यात येणार आहे. याचा वाचक व रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अंकाच्या संपादिका व प्रकाशिका आसावरी इंगळे यांनी केलंय.

‘रेणुका आर्टस्’ने यापूर्वी विविध स्पर्धा, सोशल मीडियाच्या इतिहासातील प्रथम ऑनलाईन साहित्य संमेलन, कार्यशाळा, फादर्स डे स्पेशल, पंचमदा स्पेशल वगैरे सारखे उपक्रम राबविले आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − two =