सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मंगळूरू एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत
१६ वर्षांच्या प्रयत्नांना यश; कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा आनंदोत्सव, प्रवाशांची मोठी सोय
सावंतवाडी :
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजूर झालेल्या मंगळूरू एक्स्प्रेसच्या थांब्यानंतर आज सकाळी प्रथमच ही गाडी स्थानकात दाखल झाली. यानिमित्त कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच तालुक्यातील नागरिकांनी रेल्वेचे जल्लोषात स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नव्याने मिळालेल्या या थांब्यामुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी सांगितले की, या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी तब्बल १६ वर्षे प्रयत्न सुरू होते. विशेषतः गेल्या चार वर्षांपासून कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर सावंतवाडी स्थानकाला हा महत्त्वाचा थांबा मिळाला आहे. यासाठी रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे प्रशासन, केंद्रीय मंत्री तसेच सर्व लोकप्रतिनिधींचे त्यांनी आभार मानले.
यावेळी मिहीर मठकर यांनी पुढे सांगितले की, कोकण रेल्वेचे शिल्पकार लोकनेते मधू दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी स्थानकाला ‘टर्मिनस’ची ओळख मिळाली असून, त्या नावाला साजेसा आधुनिक टर्मिनस लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून साकारावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या स्वागत सोहळ्यास कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या संख्येने सावंतवाडीकर उपस्थित होते.
