गढूळ पाण्यावरून माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग आक्रमक; ‘लोकांच्या जीवाशी खेळ का?’
मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत प्रशासनाला धारेवर; तातडीने दुरुस्तीचे आश्वासन, अन्यथा नगरपरिषदेवर मोर्चाचा इशारा
सावंतवाडी :
शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी सोमवारी नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले. गढूळ पाणी सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे? यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी श्री. वारंग गढूळ पाण्याचा नमुना घेऊन नगरपरिषदेत आले होते. मात्र, मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांची भेट घेत गढूळ पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारला.
यावेळी अधिकारी अंधारे यांनी पाईपलाईनला गळती झाल्यामुळे पाण्यात गढूळपणा आला असल्याचे सांगत, आजच दुरुस्तीचे काम पूर्ण करून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
मात्र, श्री. वारंग यांनी हे स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचे सांगत, गढूळ पाण्यामुळे लहान मुले व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी केली. तसेच तात्काळ उपाययोजना न झाल्यास नगरपरिषदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी माजी नगरसेवक अशोक पवार यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या कामामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर संबंधित कंपनीकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात येईल, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सत्यजित धारणकर, अशोक पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
