You are currently viewing “आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा!” – मुसळधार पावसात युवकांची प्रकल्प समर्थनार्थ भव्य बाइक रॅली

“आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा!” – मुसळधार पावसात युवकांची प्रकल्प समर्थनार्थ भव्य बाइक रॅली

“आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा!” – मुसळधार पावसात युवकांची प्रकल्प समर्थनार्थ भव्य बाइक रॅली

पर्यावरणपूरक विकास, स्थानिकांना रोजगार आणि स्थलांतराला विरोध; शेकडो युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

देवगड :

मुसळधार पावसाची पर्वा न करता देवगड तालुक्यातील शेकडो युवकांनी रविवारी विकास, रोजगार आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या समर्थनार्थ भव्य मोटारसायकल रॅली काढून आपली ठाम भूमिका मांडली. “आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा… आम्ही देवगड सोडणार नाही… पर्यावरणपूरक प्रकल्प झालाच पाहिजे…” अशा बुलंद घोषणांनी देवगड परिसर दणाणून गेला.
जामसंडे येथील दिर्बादेवी मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली. शुक्रवार बाजारपेठ मार्गे ही रॅली देवगड शहरात पोहोचली. भर पावसातही युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात घोषणाफलक आणि अंगावर “आम्हाला देवगडमध्ये रोजगार हवा” असा संदेश असलेले रेनकोट परिधान करून युवकांनी आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त केल्या.
या रॅलीत ललित चांदोसकर, सिद्धेश माणगावकर, आर्यन माने, दीपक जानकर, ओंकार सारंग, निशांत शिंदे, हर्ष शेटये, ओंकार तावडे, शैल पांचाळ, आशिष जाधव, उदय पालेकर, राजन घाडी, मकरंद सावंत, उमर सोलकर, कृष्णा कोंडकर, श्रीकांत चव्हाण, विराज तेली, सत्येन जामसांडेकर, परिमल नलावडे, शुभम महाजन, जितेश मोहिते, जयराज राजम, श्रवण माळी, दीप नलावडे, मनीष तेंडुलकर, जयेश पारकर, मोहित बंगरे, सर्वेश सकपाळ, साहिल लाड, राशील जाधव, विक्रम रायका, सोहम माने, साहिल सावंत, खुशल कदम, दुर्गेश साठे यांच्यासह शेकडो युवक सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान युवकांनी पर्यावरणाचा समतोल राखत विकास साधणारे उद्योग व प्रकल्प उभारावेत आणि स्थानिक युवकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली. भरधाव पावसातही युवकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. त्यांच्या शिस्तबद्ध रॅलीने आणि जोशपूर्ण घोषणांनी नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले.
या रॅलीतून देवगडच्या नव्या पिढीचा आपल्या मातीत राहूनच प्रगती करण्याचा निर्धार अधोरेखित झाला. “रोजगारासाठी स्थलांतर नव्हे, तर विकास आपल्या गावातच हवा,” असा भावनिक संदेश देत युवकांनी प्रकल्पांच्या समर्थनार्थ आपली भूमिका स्पष्ट केली. पर्यावरणपूरक उद्योगांच्या माध्यमातून देवगडचा सर्वांगीण विकास व्हावा आणि स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळावे, हीच आजच्या युवा पिढीची अपेक्षा असल्याचे या रॅलीतून ठळकपणे समोर आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा