You are currently viewing आजगावजवळ कदंबा बस कलंडली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४५ प्रवाशांचे प्राण वाचले

आजगावजवळ कदंबा बस कलंडली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४५ प्रवाशांचे प्राण वाचले

आजगावजवळ कदंबा बस कलंडली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४५ प्रवाशांचे प्राण वाचले

दुचाकीस्वाराला वाचविताना बस रस्त्यालगत कलंडली; २०० फूट खोल दरीत कोसळण्याचा मोठा अनर्थ टळला

सावंतवाडी

गोवा राज्य परिवहन महामंडळाची (कदंबा) पणजी–शिरोडा–वेंगुर्ला ही प्रवासी बस आजगाव येथील वाघबीळ परिसरात सोमवारी सायंकाळी अपघातग्रस्त झाली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्यालगत कलंडली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस खोल दरीत कोसळण्यापासून बचावली आणि बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजी येथून सायंकाळी साडेचार वाजता सुटलेली कदंबा बस शिरोडामार्गे वेंगुर्ल्याकडे जात होती. आजगाव येथील वाघबीळ परिसरातील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहतुकीदरम्यान एका दुचाकीस्वाराने अचानक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचविण्यासाठी चालक धनंजय आसोलकर यांनी प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली. यावेळी बस रस्त्यालगत कलंडली.

घटनेनंतर वाहक सर्वेश नाईक आणि चालक धनंजय आसोलकर यांनी तत्काळ आपत्कालीन दरवाजा उघडून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आजगाव परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली, तरी बस ज्या ठिकाणी कलंडली त्या ठिकाणापासून अवघ्या काही फुटांवर सुमारे २०० फूट खोल दरी असल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, ज्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला, तो आपली दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे चालक धनंजय आसोलकर यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा