You are currently viewing मत्स्य व्यावसायिक श्याम सारंग यांचे 35 लाखाचे नुकसान

मत्स्य व्यावसायिक श्याम सारंग यांचे 35 लाखाचे नुकसान

निवती समुद्रातील बोटीला आग लावणाऱ्या संशयीताला अटक;  पोलिसांची कसून चौकशी

कुडाळ

निवती येथे समुद्रात नांगरून ठेवलेल्या मत्स्य व्यावसायिक श्याम चंद्रकांत सारंग यांच्या मालकीच्या ‘चांदणी’ या मिनी पर्सनेट बोटीला बुधवारी मध्यरात्रीनंतर समुद्रात जाऊन आग लावण्यात आली. यात बोटीवरील तीन इंजिन व जाळ्यांनी पेट घेतल्याने समुद्रात आगडोंब उसळला. या आगीत बोटीसह तीन इंजिन, जाळी, टीव्ही कॅमेरा, फिश फायंडर व लाईट सिस्टिम जळून सुमारे ३५ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाले.

निवती पोलिसांना समुद्रात उभ्या करून ठेवलेल्या बोटीला अज्ञाताने आग लावल्याची माहिती
मिळताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. हा गुन्हा दाखल होताच निवती मेढा ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये रात्री १० ते २ च्या सुमारास एकजण संशयास्पद फिरताना दिसून आला. त्याच्या नावाची, गावाची खात्री केली असता, त्याचे नाव दीपेश संजय धुरी असल्याचे समजले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच आपण हे कृत्य व्यावसायिक वादातून केल्याची कबुली त्याने दिली. आपल्याकडील खलाशी हे काम सोडून शाम सारंग यांच्याकडे कामाला जात होते. त्यामुळे आपले व्यावसायिक नुकसान होत होते. त्या रागाने हे कृत्य आपण केल्याचे त्याने सांगितले. घटना समजल्यापासून अवघ्या १२ तासांच्या आत ही अटकेची कारवाई पोलिसांनी केली. त्यामुळे निवती पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

संशयित छोटी होडी वल्हवीत समुद्रात सारंग यांच्या बोटीपर्यंत गेला. बोटीचे इंजिन सुरू करून बोट बाजूला नेली व नंतर तेथीलच पेट्रोल घेऊन आग लावून त्याच छोट्या होडीने तो किनाऱ्यावर आला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या तपासाबद्दल निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील राणे, उपनिरीक्षक संकेत पगडे, हवालदार प्रदीप गोसावी, मारुती कांदळगावकर, सुभाष नाईक, नासीर शेख यांचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळुंखे यांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान, आग लावण्याच्या या घटनेमुळे निवती श्रीरामवाडी भागात गेले असता, शाम सारंग यांची बोट एकच खळबळ उडाली. निवती बंदरात मोठ्या बोटी आत आणता येत नसल्याने समुद्रात नांगरून ठेवल्या जातात. बुधवारी सायंकाळी काही मच्छीमाराने सहा सात बोटी आत नांगरून ठेवल्या होत्या. रात्री उशिरा गुपचूप समुद्रात जाऊन श्याम सारंग यांचीच बोट शोधून तिचा नांगर दोर कापून ती बोट बाजूला नेऊन आग लावण्यात आली. जाळ्यांनी पेट घेतल्यानंतर इंजिन व अन्य साहित्य पेटले आणि समुद्रात आग डोंग उसळला. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना समुद्रात बोटीला आग लागलेली दिसली. त्यांनी मोबाईल वरून किनारपट्टीवर घटनेची कल्पना दिली. त्यामुळे लागलीच मच्छीमार जमा झाले आणि अन्य बोटीने समुद्रात गेले असता श्याम सारंग यांची बोट व जाळी जाळण्यात आल्याचे लक्षात आले. बोट वारा असल्याने सात ते आठ वाव खोल समुद्रात गेली होती. तिथपर्यंत जाऊन पाणी मारून आग विझवण्यात आली. नंतर ही बोट अन्य बोटींना बांधून ओढून किनाऱ्यावर आणण्यात आली.

श्याम सारंग यांनी नियुक्ती पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली. आपल्या मालकीची फायबर बोट (नंबर आयएनडी – एमएच 5 – एमएम 1747) निवती येथे समुद्रात उभी करून ठेवली होती. अज्ञाताने बोटीत प्रवेश करून बोटीतील पेट्रोलने जाळी व बोटीला आग लावून नुकसान केले. या आगीत सुमारे 35 लाख 81 हजार रुपयांचे रुपयांचे नुकसान झाले. असे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा