दिव्यांग लाभार्थ्यांसाठी युडीआयडी कार्ड अनिवार्य; अर्जासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ
मालवण
केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) बंधनकारक करण्यात आले असून हे कार्ड आधार कार्डशी लिंक करणेही आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप यूडीआयडी कार्ड नाही, त्यांना स्वावलंबन पोर्टलवर अर्ज करण्यासाठी १५ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिली.
शासनाच्या परिपत्रकानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आदी योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना यूडीआयडी कार्ड काढणे आवश्यक आहे.
दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना १५ जून २०२६ पर्यंत स्वावलंबन पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक होते. मात्र, विभागाच्या अवर सचिवांच्या पत्रानुसार ही मुदत आता १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.
तहसीलदार लव्हे यांनी सांगितले की, विशेष सहाय्य योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी आपले वैश्विक ओळखपत्र काढून घेणे अत्यावश्यक आहे. विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील काळात शासकीय अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते.
यूडीआयडी कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांनी स्वावलंबन पोर्टलवर नोंदणी करावी किंवा जवळच्या महा ई-सेवा केंद्रात जाऊन अर्ज सादर करावा. यासाठी आधार कार्ड, शिधापत्रिका, दिव्यांगत्व दर्शविणारा फोटो, पूर्वीचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच पूर्वी नोंदणी केली असल्यास त्याची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
फॉर्म भरल्यानंतर लाभार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे शारीरिक तपासणी करून घेऊन यूडीआयडी कार्ड मिळविण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार गणेश लव्हे यांनी केले आहे.
