*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांनी कवी दीपक पटेकर लिखित “भेट” कवितेचं केलेलं रसग्रहण*
*शीर्षक:भेट*
✒️कवी:मा.दीपक पटेकर.(दीपी), सावंतवाडी
एखादं नातं विरून जातं पण त्या नात्यातले अनुभवलेले काही हळुवार कोमल प्रीतीचे क्षण मात्र नकळत सोबत राहतात. प्रेमाची परिणीती जरी निर्णायक झाली नसली तरी भावनांचा अविष्कार पुसत नाही. रोजच्या जीवनचक्रात हे सारं गरगरत असतंच पण अचानक असं काहीतरी घडतं की काळ, परिस्थिती, मागे घडलेलं सारं काही विसरून जायला होतं आणि मन पुन्हा त्या मधुर क्षणांच्या आठवणीत रमतं. हरवलेलं गवसू लागतं.
“बकुळीची फुले” या कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या काव्यसंग्रहातील *भेट* ही कविता वाचल्यानंतर मनात हेच विचार झळकून गेले. अतिशय भावूक आणि हळुवार कविता! ती वाचली आणि तिचा रसास्वाद घ्यावासा वाटला. प्रथम कविता वाचूया.
भेट.
भेट अचानक होते तेव्हा
जुन्या आठवा डोळे भरती
वरवर शांती परी अंतरी
विचारचक्रे गरगर फिरती …
भेट अचानक होते तेव्हा
मुके शब्द अन् नयन बोलती
नसे वाच्यता फक्त शांतता
नयनामध्ये तिज साठवती..
भेट अचानक होते तेव्हा
थरथर थरथर अधर कांपती
श्वासामध्ये वाढुनि अंतर
हृदयामधले ठोके चुकती ..
भेट अचानक होते तेव्हा
जुने वाद अन् भांडण स्मरती
रुसवे फुगवे हास्यात विरुनि
हातामध्ये हातच धरती …
भेट अचानक होते तेव्हा
स्पर्शामधुनी ओढ जाणती
मनपटलावर होउनि हलचल
येते लाली गालांवरती..
भेट अचानक होते तेव्हा
नयन इशारे नयना कळती
अधरांशी अधरांनी बोलुनि
मिटून डोळे मिठास घेती..
*दीपक पटेकर*
या कवितेत एका ब्रेकअपची कहाणी आहे.
भेट अचानक होते तेव्हा
जुन्या आठवा डोळे भरती
बरोबर शांती परि अंतरी
विचारचक्रे गरगर फिरती…
सगळं काही संपलेलं असताना, ध्यानीमनी नसताना अचानक ती भेटते आणि जुन्या मधुर आठवणी जाग्या होतात. डोळे पाणावतात. काळाने सगळं बदललेलं असतं. दोघांचीही जीवने आता वेगवेगळ्या दिशेला पांगलेली असतात. त्यामुळे असे एकाएकी पुन्हा भेटल्यानंतर त्याच्याकडून कुठलीही उत्तेजित प्रतिक्रिया जरी परिस्थितीचे भान ठेवून झाली नसली तरी अंतरात मात्र असंख्य विचारचक्रे फिरू लागतात. ती कशी असेल या क्षणी?
तिच्या मनात नक्की कोणते भाव असतील?
माझ्या मनातल्या भावांशी त्यांचे साम्य असेल का? वगैरे शंका त्याच्या मनात स्वाभाविकपणे डोकावतात.
भेट अचानक होते तेव्हा
मुके शब्द अन् नयन बोलती
नसे वाच्यता फक्त शांतता
नयनामध्ये तिज साठवती..
या अनपेक्षित भेटीत शब्द, वाचा मूक झाली असली तरी नजरेच्या भाषेतून अर्थ झिरपत आहेत. तो फक्त त्या क्षणी तिचे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवत आहे.
भेट अचानक होते
थरथर थरथर अधर कांपती
श्वासामध्ये वाढुनि अंतर
हृदयामधले ठोके चुकती..
शृंगार, प्रीतभावना, प्रणयातुरता या अशा काही हळुवार कोमल भावना आहेत की त्या जेव्हा अंत:प्रवाहात जाणवतात तेव्हा त्याची स्पंदनं देहावर उमटतात. त्याचं कवीने नेमकं वर्णन या कडव्यात केलेलं आहे. तिला पाहिलं आणि नकळत ओष्ठद्वयांचं कंपन जाणवलं. श्वास जणू काही थांबला आणि हृदयातले ठोके वाजू लागले. धडधड जाणवू लागली. हरवलेल्या प्रेमाच्या आशावादामुळे होणारी देह स्थिती आणि त्याचा अनुभव असा निराळाच असावा, हे कवीने अत्यंत समर्थ शब्दात वेचले आहे.
भेट अचानक होते तेव्हा
जुने वाद अन भांडण स्मरती
रुसवे फुगवे हास्यात विरुनि
हातामध्ये हातच धरती…
कसं असतं ना? प्रेमामध्ये वाद असतात भांडण असतात, रुसवे फुगवे सारं काही असतं. नात्यात अंतर पडतं, दरी निर्माण होते. पण ते तेवढ्यापुरतंच असतं. रागाच्या भरात तुटफुट झालेली असते पण पुन्हा अचानक भेट घडल्यानंतर मात्र “कसं चुकलं आपलं!” हे जाणवून हास्य फुलतं आणि एकमेकांचं नातं किती घट्ट आहे याची साक्ष हातात हात धरल्यावर मिळते.
भेट अचानक होते तेव्हा
स्पर्शामधुनी ओढ जाणती
मनपटलावर होउनि हलचल
येते लाली गालावरती…
काळाबरोबर जे विसरलं गेलं असं वाटत असतानाच दोघांची अचानक भेट होते आणि जाणवतं आपल्यात अजून सारे काही तसेच आहे. स्पर्शातली ओढ आजही कायम आहे आणि मनावर लहरलेल्या या तरंगांनी पुन्हा शरीरात एक लाट उसळते. जे आतापर्यंत दडपलं होतं ते जागू लागतं आणि त्या भावनेने दोघेही तितकेच हरखून जातात. क्षणात जे त्याला वाटत होतं ते तिलाही वाटतंय याची साक्ष तिच्या गालावर चढलेली लाली देते.
भेट अचानक होते तेव्हा
नयन इशारे नयना कळती
अधरांशी अधरांनी बोलुनि
मिटून डोळे मिठास घेती..
कवितेतलं हे शेवटचं कडवं म्हणजे भावनांनी गाठलेला शिखरबिंदू आहे. याप्रसंगात शब्दांचं काही कामच उरत नाही. प्रीतीची भाषा ही केवळ नयनांतून व्यक्त होते. इथे शब्द बोलत नाहीत नजरा बोलतात. नजरेचे इशारेच पुरे असतात मग सारे बंध सुटतात, नियम अटी नाहीशा होतात. या क्षणी खरं फक्त एकच असतं ते म्हणजे प्रीतीची ओढ, स्पर्शाची आतुरता, पुन्हा एकदा एकमेकांनी दिलेली देहाची हाक आणि अर्थात मग बेभानपणे ओठावर ओठ टेकतात आणि डोळ्यांची पाखरं अलगद मिटतात. त्यानंतरचा अनामिक आनंद आणि गोडवा मिटलेल्या देहात उसळतो.
तुटलेलं एक नातं पुन्हा जुळतं.
दीपक पटेकरांची ही कविता वाचल्यानंतर फक्त दोनच शब्द ओठावर येतात,” निव्वळ अप्रतिम!”
ही संपूर्ण कविता पादाकुलक वृत्तात रचलेली आहे. अतिशय सहज- सुलभ, लयबद्ध शब्दरचना. संपूर्ण काव्यभाव वाचकाच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी रसमय शब्दशैली. चोवीस ओळींच्या या कवितेत ओळींपलिकडचे कित्येक न लिहिलेले भावशब्दही वाचक वाचतो आणि एका वेगळ्याच भावविश्वात रमून जातो.
या कवितेचं वैशिष्ट्य असं की “भेट अचानक होते तेव्हा” ही या काव्याची मध्यवर्ती टॅगलाईन आहे आणि प्रत्येक कडव्यात या भेटीमुळे निर्माण झालेला अलवार भावरंग टिपण्यात कवीची संवेदनशीलता आणि शब्दसामर्थ्य जाणवते. दोन प्रेमिकांची ही भेट जशीच्या तशी त्याच गोडव्याने आणि भावनाविष्काराने डोळ्यासमोर उभी राहते. हा स्वभावोक्ती अलंकार कवीने फार सुंदर साधला आहे.
शृंगार रसात, प्रेमभावात भिजलेले हे काव्य वाचताना कुठेही अश्लीलता जाणवत नाही.
झाडावर फुल उमलावं आणि भ्रमराने पाकळ्यांवर हळूच उतरावे इतका अलगद शृंगार या काव्यात आहे. विरहानंतरच्या या शृंगारात पुनर्मिलनाची उत्कटता आहे. “कामोत्तेजिता” ही नैसर्गिक भावना आहे आणि त्याचं वर्णन जर संयतपणे केलं तर ते विकृत न वाटता सौंदर्यशाली वाटतं आणि शृंगारिक काव्य वाचताना हा अनुभव येणं हे शब्दांचे सामर्थ्य आणि कवितेचे यश अधोरेखित करतं.
दीपीजी, आपलं मनापासून अभिनंदन आणि आपला हा काव्यप्रवास सातत्याने होत राहो हीच शुभेच्छा!
*राधिका भांडारकर* वाकड, पुणे
