हिंदू एकता आणि संस्कृती संवर्धनाचा जागर; तुळसमध्ये २१ जून रोजी भव्य सकल हिंदू संमेलन
वेंगुर्ले
हिंदू समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाज यांच्या वतीने *रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सायंकाळी ३.३० ते ६ या वेळेत उत्सव मंगल कार्यालय, तुळस* येथे भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तुळस, पाल, अणसुर, पेंडूर, मातोंड, होडावडे आणि वजराट या सात गावांतील हिंदू बांधवांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
सनातन हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन, अनुकरणीय आणि आदर्श संस्कृती मानली जाते. हजारो वर्षांच्या परंपरेतून मानवतेला अध्यात्म, सहिष्णुता, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचे मूल्य देणारी ही संस्कृती आजही समाजाला दिशा देत आहे. पाचशे वर्षांच्या अथक प्रयत्नांच्या फलितातून पुनर्निर्माण झालेले अयोध्येतील श्रीराम मंदिर हे हिंदू समाजाच्या श्रद्धा, समर्पण आणि एकतेचे प्रतीक बनले आहे. त्यामुळे हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून धर्म आणि संस्कृतीप्रती अभिमानाची भावना अधिक दृढ झाली आहे.
सध्याच्या काळात सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक स्तरावर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत हिंदू समाजाने आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणे, संघटित होणे आणि समाजहितासाठी कार्य करणे आवश्यक असल्याची भावना या संमेलनामागे आहे. हिंदू समाजातील सर्व घटकांमध्ये संवाद वाढावा, युवकांमध्ये संस्कारांची जपणूक व्हावी, समाजात राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक जाणीव दृढ व्हावी तसेच हिंदू समाजाच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन व्हावे, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनासाठी ज्येष्ठ कीर्तनकार सुबोध मराठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात गणेश गोविंद उर्फ राजू जोशी गुरुजी हे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान, संस्कृतीचे महत्त्व आणि संघटित समाजाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक हे हिंदू समाजासमोरील विविध आव्हाने, धर्मजागृती आणि संघटनात्मक कार्य यावर आपले विचार मांडणार आहेत. याशिवाय अमित गोपाळ नाईक हे देखील उपस्थितांना संबोधित करून मार्गदर्शन करणार आहेत.
संमेलनाच्या तयारीसाठी समित्यांची स्थापना करण्यात आली असून परिसरात व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. सातही गावांतील कार्यकर्ते संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हिंदू समाजाची एकजूट, सामाजिक सलोखा, सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रहिताची भावना अधिक बळकट करण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. संमेलनात उपस्थित राहणाऱ्या सर्वांनी सहकुटुंब, मित्रपरिवारासह पारंपरिक मंगल वेशात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
