*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”कुठे राहिलास मेघराजा?”*
मी पुन्हा येईन म्हणून,
आलास खरा एक दिवस
कविताही चिंब भिजली होती
रिमझिम सुरांना बरोबर घेऊन
वाटत होत,तूही जरासं गावस
आसुसलेल्या, भेदरलेल्या डोळ्यांनी
आकाशाकडे पाहत आहे “बळीराजा ”
काळ्या आईची ही,आर्त विचारणा
तू कुठे राहिलास मेघराजा?
आघात सोसून युद्धाचे,
जर्जर झाली धरणी माता
वृक्ष छेदून रण झाले
हा विकास नव्हे,ही भकास कथा
वनि काननी,पक्षी 🐦, प्राणी
तृषार्त होऊनी प्राण त्यागती
जीवन होऊनी बरस राजा
ही आर्त करुणा,तुला भाकती
सरत आला “मृग”सरींचा
नको धरुस तू रुसवा
झरझर झरणारा तू
असा कसा रे, तू फसवा
आरंभीचा “उनाड” पाऊस
करीत येतसे, गाजावाजा
चिंताक्रांत आहे धरती
तू कुठे राहिलास मेघराजा?
रचना:– मोहन मराठे
