पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा कणकवलीत घेतला आढावा
‘राष्ट्र प्रथम’ धोरणामुळे भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचा दावा
कणकवली / प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या निर्णयांचा आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असुरक्षिततेचे वातावरण होते. मात्र मोदी यांनी देशाला त्या परिस्थितीतून बाहेर काढून जागतिक स्तरावर सुरक्षित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करून दिली, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा मान मिळवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक व सामरिक महासत्ता बनत असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला. कणकवली येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई, संदीप साटम, मिलिंद मेस्त्री आणि भाई सावंत, संजय वेंगुर्लेकर, मधुकर देसाई उपस्थित होते.
नितेश राणे यांनी २०१४ पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या कारभारावर टीका करताना सांगितले की, त्या काळात अल्पसंख्याकांना केंद्रस्थानी ठेवून केवळ ‘व्होट बँक’ सांभाळण्यासाठी राजकारण करण्यात आले. त्यामुळे हिंदू समाज आणि त्यांच्या धार्मिक स्थळांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. वक्फ कायद्यासारख्या नियमांमुळे अन्याय होत होता, असे त्यांनी नमूद केले.
देशात सतत दहशतवादी कारवाया आणि असुरक्षिततेची भावना होती. “पूर्वी कधी पंतप्रधान महाआरती करताना दिसले होते का?” असा सवाल उपस्थित करत मोदी सरकारने देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेला सन्मान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
२०१४ नंतर ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून देशाची वाटचाल सुरू झाली. मोदी सरकारने हिंदू समाजाला केंद्रबिंदू मानून आदरयुक्त स्थान दिले. वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेले अयोध्येतील भव्य राम मंदिर शांततेत उभे राहिले. तसेच काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि उज्जैन महाकाल कॉरिडॉर यांच्या विकासामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली.
देशातील धार्मिक स्थळे सुरक्षित करून हिंदू समाजाला त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य मोदी सरकारने केल्याचे राणे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशातच नव्हे तर परदेशातही हिंदू ओळख अभिमानाने मांडतात आणि सनातन धर्माला प्रोत्साहन देतात, असे राणे यांनी नमूद केले. आज पाकिस्तान किंवा कोणत्याही जिहादी संघटनेची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही. कोणी तसा प्रयत्न केल्यास ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या कारवायांद्वारे कठोर उत्तर दिले जाते, असे त्यांनी सांगितले.
भारत आज जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक म्हणून ओळखला जात असून, त्यामागे मोदी यांचे नेतृत्व आणि ठाम निर्णयक्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राम मंदिराचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मोदी सरकारने यशस्वीपणे सोडविला. अयोध्या, काशी विश्वनाथ आणि उज्जैन यांसारख्या प्रमुख धार्मिक स्थळांचा कायापालट करून देशात धार्मिक पर्यटनाचे नवे पर्व सुरू करण्यात आले. तसेच वक्फ कायद्याच्या कचाट्यातून हिंदू समाजाला हक्काच्या जमिनी परत मिळवून देत धार्मिक स्थळांना संरक्षण देण्यात आले.
जागतिक स्तरावर भारताला पहिल्या तीन देशांच्या पंक्तीत आणण्याचे अभूतपूर्व कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
