You are currently viewing निविदा रखडल्याने चार जिल्ह्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; राजू मसूरकर यांची मंत्रालयाकडे धाव

निविदा रखडल्याने चार जिल्ह्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; राजू मसूरकर यांची मंत्रालयाकडे धाव

निविदा रखडल्याने चार जिल्ह्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; राजू मसूरकर यांची मंत्रालयाकडे धाव

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी व सांगलीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून हाल; तातडीने निविदा काढण्याची मागणी

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सांगली या चार जिल्ह्यांतील आरोग्य विभागाच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एप्रिल २०२६ पासून मंत्रालय स्तरावरील नवीन निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यासमोरील अडचणींबाबत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांना माहिती देण्यात आली.
सावंतवाडी ट्रॉमा केअरमधील कर्मचाऱ्यांनी ही बाब मसूरकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेतली. मंत्रालय स्तरावर नवीन निविदा प्रसिद्ध न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले. यानंतर मसूरकर यांनी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी केली.
यावेळी त्यांनी सिंधुदुर्गसह चार जिल्ह्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. सध्या या कर्मचाऱ्यांना दरमहा अवघे ९ हजार रुपये मानधन मिळत असून दिवसाला साधारण ३०० रुपयांपेक्षा कमी मोबदल्यात ते रुग्णसेवेचे अत्यंत महत्त्वाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांची देखभाल, ड्रेसिंगसाठी रुग्णांना व्हीलचेअरवरून ने-आण करणे, स्वच्छतागृहाची स्वच्छता, रुग्णांच्या बेडची साफसफाई, डायपर बदलणे तसेच विविध सेवा पुरविण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येत असून रुग्णसेवा अधिक कठीण होत चालल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
“रुग्णसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे मंत्रालय स्तरावर गांभीर्याने पाहिले जाणे आवश्यक आहे. त्यांना न्याय्य वेतन व रोजगाराची हमी मिळाली पाहिजे,” असे मत राजू मसूरकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या विषयाची दखल घेऊन लवकरच आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा