पूर्ण झालेल्या कामांचे छायाचित्रांसह पुरावे सादर करणे बंधनकारक; गुणवत्ता आणि मुदतीवर भर
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा विकास आराखड्यातील कामांचा विशेष आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. यावेळी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विकासकामांसाठी पारदर्शक व परिणामकारक वापर व्हावा, असे सांगत पूर्ण झालेल्या सर्व कामांचे छायाचित्रांसह पुरावे सादर करणे बंधनकारक राहील. तसेच लोकप्रतिनिधींकडून प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामांची पडताळणी केली जाईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालकमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला मिळणाऱ्या निधीचे वेळेत नियोजन करून सर्व विकासकामे मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना आ. राणे यांनी दिल्या. “कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण झाली पाहिजेत,” असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे बजावले.
महायुती सरकारकडून जिल्हा नियोजन समितीमार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत क्षेत्रांना प्राधान्य देऊन आवश्यक निधीची मागणी वेळेत नोंदविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
भविष्यात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि अन्य आमदारही जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेणार असल्याने विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, दत्ता सामंत, बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, शिक्षण समिती सभापती प्रितेश राऊळ, रुहिता तांबे, अनुराधा नारकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
