You are currently viewing पुरुषोत्तम मासाचे महत्त्व

पुरुषोत्तम मासाचे महत्त्व

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*पुरुषोत्तम मासाचे महत्त्व*

 

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यापैकी “पुरुषोत्तम मास” किंवा “अधिक मास” हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. साधारणपणे दर तीन वर्षांनी एकदा हा महिना येतो. चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यामधील फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अतिरिक्त महिना जोडला जातो त्यालाच अधिक मास म्हणतात.

भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचे नाव दिल्यामुळे तो “पुरुषोत्तम मास” म्हणून प्रसिद्ध झाला. हा महिना भक्ती, जप, तप, दान, व्रत आणि आत्मचिंतनासाठी सर्वोत्तम मानला जातो…

पुराणांमध्ये पुरुषोत्तम मासाचे विशेष वर्णन आढळते… पूर्वी या महिन्याला कोणतेही महत्त्व नव्हते. सर्वजण त्याला “मलमास” म्हणून तुच्छ मानत असत. त्यामुळे हा महिना दुःखी होऊन भगवान विष्णूंकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला आपले “पुरुषोत्तम” हे नाव दिले आणि सांगितले की जो मनुष्य या महिन्यात श्रद्धेने पूजा, जप, दान आणि व्रत करेल त्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होईल. त्या दिवसापासून या महिन्याला विशेष धार्मिक स्थान प्राप्त झाले.

पुरुषोत्तम मास हा भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत उत्तम काळ मानला जातो

पुरुषोत्तम मासामध्ये भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची पूजा करण्यास विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भक्तांनी लवकर उठून स्नान करावे, देवपूजा करावी, भगवद्गीता, विष्णुसहस्रनाम, भागवत आणि रामायण यांचे पठण करावे. मंदिरात जाऊन दर्शन घेणे, तुळशीची पूजा करणे आणि हरिनामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात केलेले प्रत्येक सत्कर्म अनेक जन्मांचे पाप नष्ट करते अशी श्रद्धा आहे.

दानधर्मालाही पुरुषोत्तम मासात खूप महत्त्व दिले जाते. अन्नदान, वस्त्रदान, गोरगरीबांना मदत, गाईला चारा देणे, ब्राह्मणांना भोजन देणे इत्यादी कार्य पुण्यदायी मानले जाते. विशेषतः अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. या महिन्यात केलेले दान अक्षय फळ देणारे असते असे धर्मग्रंथ सांगतात तसेच

आत्मशुद्धी आणि आत्मपरीक्षणासाठीही महत्त्वाचा आहे. उपवास, संयम, सत्संग आणि साधना यामुळे मनुष्याच्या मनातील वाईट विचार दूर होतात. माणूस आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळवतो त्यामुळे हा महिना आध्यात्मिक उन्नतीचा काळ मानला जातो.

या महिन्यात काही शुभकार्ये जसे की विवाह, गृहप्रवेश, मुंज इत्यादी सहसा केली जात नाहीत. कारण हा महिना प्रामुख्याने भक्ती आणि साधनेसाठी राखून ठेवलेला आहे. लोक या काळात आध्यात्मिक उन्नतीवर अधिक भर देतात. त्यामुळे हा महिना ईश्वरभक्ती आणि आत्मपरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो…अनेक भागात या महिन्यात भजन, कीर्तन, हरिपाठ आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते. अनेक भक्त तीर्थयात्रा करतात…काहीजण संपूर्ण महिनाभर उपवास किंवा एकवेळ भोजन करतात. या धार्मिक वातावरणामुळे समाजामध्ये एकात्मता, सद्भावना आणि संस्कारांची जपणूक होते.

शेवटी असे म्हणता येईल की पुरुषोत्तम मास हा केवळ अतिरिक्त महिना नसून मनुष्याच्या आत्मिक आणि नैतिक विकासासाठी महत्त्वपूर्ण संधी आहे. भक्ती, दान, जप आणि सत्कर्म यांच्या माध्यमातून जीवन अधिक पवित्र आणि आनंदी बनवण्याचा संदेश हा महिना देतो म्हणूनच हिंदू धर्मामध्ये पुरुषोत्तम मासाला अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि कल्याणकारी महिना मानले जाते…

 

पुरुषोत्तम मास पावन आला ।

भक्तीभावे जीव उजळला ॥धृ॥

 

हरीनामाचा गजर झाला ।

अंतरीचा अंधार गेला ॥१॥

 

जप तपाने चित्त निवळे ।

विष्णुकृपेने दुःख पळे ॥२॥

 

गीता भागवत वाचा प्रेमे ।

श्रीहरी भेटे भक्तिभावे ॥३॥

 

तुळशीवृंदावनी दीप लावा ।

नारायणाचे गुण गावा ॥४॥

 

अन्नदान हे श्रेष्ठ कर्म ।

त्यातच दडले ईश्वरधर्म ॥५॥

 

संतसंगती अमृतवाणी ।

शांत होई जीवाभावनी ॥६॥

 

पुरुषोत्तम मास महान ।

कृपा करी श्रीनारायण ॥७॥

 

भक्ती, सेवा, सत्य धरा ।

जीवन सुंदर पवित्र करा ॥८॥

 

 

लेखिका/कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा