You are currently viewing चिपी-गोवा जलवाहतुकीपेक्षा चिपी विमानतळावरील विमानसेवा वाढवा; मनसेची मागणी

चिपी-गोवा जलवाहतुकीपेक्षा चिपी विमानतळावरील विमानसेवा वाढवा; मनसेची मागणी

चिपी-गोवा जलवाहतुकीपेक्षा चिपी विमानतळावरील विमानसेवा वाढवा; मनसेची मागणी

मुंबई-विजयदुर्ग जलसेवा बंद पडल्याचा दाखला; स्थानिक रोजगार व व्यवसायवृद्धीसाठी ठोस उपाययोजना करण्याचे कुणाल किनळेकर यांचे आवाहन

सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई येथे आयोजित बैठकीत चिपी विमानतळ ते गोवा जेटी दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या प्रस्तावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा चिपी विमानतळावरील विमानसेवा वाढविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.
किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून मुंबईतील भाऊचा धक्का ते विजयदुर्ग दरम्यान जलसेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेच्या उद्घाटनावेळी राज्य सरकारकडून कोकणाच्या विकासासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, ही जलसेवा केवळ एक-दोन फेऱ्यांनंतरच ठप्प पडली असून सध्या ती पूर्णपणे बंद असल्याची स्थिती आहे.
अशा परिस्थितीत पुन्हा चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतुकीचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. अवाजवी खर्च करून भविष्यात बंद पडण्याची शक्यता असलेली जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा चिपी विमानतळावरील विमानांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.
चिपी विमानतळावर नियमित आणि अधिक विमानसेवा उपलब्ध झाल्यास स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक व्यावसायिकांच्या व्यापारात वाढ होईल. त्यामुळे शासनाने प्राधान्याने विमानसेवा विस्तारावर भर द्यावा, अशी मागणीही कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा