विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने विटा नगरपरिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली उत्साहात पार पडली.
विटा नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरातून तिरंगा बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून बाईक रॅली काढली. यावेळी संपूर्ण शहरात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’ अशा देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दुचाकींवर डौलाने फडकणारे तिरंगे ध्वज हे नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले. देशभक्तीपर वातावरणामुळे शहरातील नागरिकांमध्येही मोठा उत्साह निर्माण झाला. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. अनेक नागरिकांनी तिरंगा रॅलीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून देशभक्तीचा हा उत्साह सोशल मीडियावरही शेअर केला.
‘हर घर तिरंगा’ अभियान केवळ घरावर तिरंगा फडकविण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करणारे अभियान आहे. या भावनेतून विटा नगरपरिषदेने आयोजित केलेल्या या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकजुटीचे दर्शन घडविले.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहरात विविध देशभक्तीपर उपक्रम राबवून नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्याचा विटा नगरपरिषदेचा प्रयत्न असून, तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
