You are currently viewing न्हावेली चौकेकरवाडीत रस्त्याची साईडपट्टी दोन वर्षांपासून कोसळलेली

न्हावेली चौकेकरवाडीत रस्त्याची साईडपट्टी दोन वर्षांपासून कोसळलेली

न्हावेली चौकेकरवाडीत रस्त्याची साईडपट्टी दोन वर्षांपासून कोसळलेली

चार दिवसांत दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा; बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थ संतप्त

सावंतवाडी

सावंतवाडी-मळेवाड मार्गावरील न्हावेली चौकेकरवाडी येथे मुख्य रस्त्याची साईडपट्टी कोसळून तब्बल दोन वर्षे उलटली असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, चार दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा न्हावेलीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर यांनी दिला आहे.
केवळ पत्रा बॅरल उभे करून प्रशासन मोकळे
कोसळलेल्या ठिकाणी सध्या केवळ पाण्याचे पत्रा बॅरल उभे करून ठेवण्यात आले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी या समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या असतानाही अधिकारी केवळ पाहणी करून जातात आणि त्यानंतर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पावसाळ्यात अपघाताचा वाढता धोका
ज्या ठिकाणी साईडपट्टी कोसळली आहे, त्या भागातून पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह मोठ्या वेगाने वाहतो. मुसळधार पावसात पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने कोसळलेला भाग आणि बाजूचा खड्डा वाहनधारकांच्या लक्षात येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढत असून, गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘अपघात झाल्यास जबाबदार कोण?’
“या ठिकाणी एखादा मोठा अपघात झाला किंवा जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण?” असा सवाल स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असताना विभागाकडून केवळ तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
अक्षय पार्सेकर यांचा आंदोलनाचा इशारा
या गंभीर समस्येची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी अक्षय पार्सेकर यांनी केली आहे. येत्या चार दिवसांत योग्य व ठोस उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आता या इशाऱ्यानंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतो का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा