नरेंद्र डोंगर होणार प्लास्टिकमुक्त; वनविभागाची पर्यावरण दिनी घोषणा
जिल्हाभरात ५ हजार वृक्षांची लागवड; स्वच्छता मोहिमेत ५० गोणी कचरा संकलित
सावंतवाडी :
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी वनविभागाने ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना जाहीर केली आहे. नरेंद्र डोंगरावर आयोजित वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेदरम्यान उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी ही घोषणा करत सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांनी कचरा कुंड्यांचा वापर करावा, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना शर्मा यांनी सांगितले की, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुढील १५ दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे दीड हजार वडाची झाडे तसेच औषधी गुणधर्म असलेल्या साडेतीन हजार नरक्या वृक्षांचा समावेश असेल.
सावंतवाडी वनविभागाच्या वतीने नरेंद्र डोंगरावर आयोजित कार्यक्रमात स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण करण्यात आले. नरेंद्र डोंगरावर वाढत्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाला होत असलेली हानी लक्षात घेऊन ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सहसचिव विनायक गावस, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार रुपेश हिराप, नागेश पाटील, भूवन नाईक, श्रीरंग सावंत, तनया रेडकर यांच्यासह वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल मिताली कुबल, प्रमोद राणे, वनरक्षक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शर्मा पुढे म्हणाले की, वनविभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनपर्यटनाला चालना देण्यात येत आहे. पारपोली, नरेंद्र डोंगर आणि आंबोली येथे होमस्टे सुविधा उपलब्ध असून आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र डोंगर येथे ‘वर्षा वन पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनीही आपले विचार मांडले. नरेंद्र डोंगरावरील खासगी वनक्षेत्रातून जमा झालेला कचरा हा समाजाला आरसा दाखवणारा असल्याचे सांगत काहींच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वृक्षारोपणाबरोबरच पिढ्यानपिढ्या वाढलेल्या आणि जपलेल्या वृक्षांचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ही झाडे आपल्या ‘आजी-आजोबां’प्रमाणे असल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग आणि निसर्गप्रेमींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, स्वच्छता मोहिमेदरम्यान नरेंद्र डोंगर परिसरातून तब्बल ५० गोणी कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
