You are currently viewing गोव्यात बाप-लेकाचा मृतदेह, पत्नी अत्यवस्थ; सोनुर्लीतील जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर

गोव्यात बाप-लेकाचा मृतदेह, पत्नी अत्यवस्थ; सोनुर्लीतील जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर

गोव्यात बाप-लेकाचा मृतदेह, पत्नी अत्यवस्थ; सोनुर्लीतील जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर

म्हापसा-करासवाडा येथील बंद खोलीत उघडकीस आली घटना; सामूहिक आत्महत्या की घातपात? पोलिसांचा तपास सुरू

सावंतवाडी
सोनुर्ली-जाधववाडी येथील जाधव कुटुंबातील बाप-लेकाचा मृतदेह गोव्यातील म्हापसा-करासवाडा परिसरातील भाड्याच्या बंद खोलीत आढळून आला, तर पत्नी अत्यवस्थ अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणामागे सामूहिक आत्महत्या आहे की अन्य काही कारण, याबाबत अद्याप स्पष्टता नसून गोवा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अजय देऊ जाधव (वय ३८) आणि त्यांचा मुलगा अथर्व (वय ७) अशी मृतांची नावे असून, पत्नी सुवर्णा जाधव (वय ३०) यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या शुद्धीवर आल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अजय जाधव हे गेल्या काही वर्षांपासून पणजीतील एका खासगी बँकेत कार्यरत होते. पत्नी सुवर्णा गृहिणी असून अथर्व शिक्षण घेत होता. हे कुटुंब गेल्या वर्षभरापासून म्हापसा-करासवाडा येथील साईनगर भागात भाड्याच्या घरात वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अजय यांनी सोनुर्ली येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांना दूरध्वनी करून, “मुलगा आणि पत्नी झोपत नाहीत,” अशी माहिती दिली होती. त्यावर वडिलांनी त्यांना देवाचा अंगारा लावण्याचा सल्ला दिला. शनिवारी सकाळी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तातडीने गोवा गाठले. ते करासवाडा येथील निवासस्थानी पोहोचले असता अजय व अथर्व मृतावस्थेत, तर सुवर्णा गंभीर अवस्थेत आढळून आल्या.
स्थानिकांच्या मदतीने सुवर्णा यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अजय आणि अथर्व यांना मृत घोषित केले असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच सोनुर्ली गावावर शोककळा पसरली. अनेक नातेवाईक आणि ग्रामस्थांनी गोवा गाठले. काही दिवसांपूर्वीच कुटुंबात विवाहसोहळा पार पडला होता आणि अजय जाधव कुटुंबीयांसमवेत आनंदाने सहभागी झाले होते. मनमिळावू आणि सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारे अजय यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अजय यांच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, पुतण्या असा परिवार आहे. ते सोनुर्लीचे माजी पोलिस पाटील रामा जाधव यांचे पुतणे, तर सोनुर्ली हायस्कूलचे शिपाई संदीप जाधव यांचे चुलत भाऊ होत. गोवा पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा