You are currently viewing बाळकृष्ण पेडणेकरची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी; ठाण्यात ७३वा क्रमांक

बाळकृष्ण पेडणेकरची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी; ठाण्यात ७३वा क्रमांक

सावंतवाडी :

विहंग कुलकर्णी चेस फाउंडेशनतर्फे ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्याने ठाणे, मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा अव्वल खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ७३वा क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल त्याला रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतील सुमारे ४९८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये तब्बल ३१४ आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंचा समावेश होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, तसेच मालवण येथील मयुरेश परुळेकर आणि मयुरेश मालवणकर यांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळ केला.

बाळकृष्णने नऊ फेऱ्यांपैकी पाच फेऱ्यांमध्ये विजय मिळवला, तर दोन फेऱ्या बरोबरीत सोडवत एकूण सहा गुणांची कमाई केली आणि ७३वा क्रमांक मिळवला. व्हिज्युअली चॅलेंज्ड विद्यार्थी मयुरेश परुळेकर याने नऊ फेऱ्यांमध्ये चार विजय आणि एक बरोबरीसह साडेचार गुण मिळवले. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये २७ गुणांची वाढ केली.

मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. ॲकेडमीच्या उपाध्यक्षा स्नेहा पेडणेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा