You are currently viewing मोती तलाव परिसरातील कचरा समस्येला अखेर दिलासा

मोती तलाव परिसरातील कचरा समस्येला अखेर दिलासा

मोती तलाव परिसरातील कचरा समस्येला अखेर दिलासा

नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांच्या पाठपुराव्याला यश; अत्याधुनिक कचरा कुंड्या बसविण्यास सुरुवात

सावंतवाडी

शहराचे मुख्य आकर्षण असलेल्या मोती तलाव परिसरातील अस्वच्छता आणि कचरा तुंबण्याच्या समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी पालिकेच्या जानेवारी महिन्यातील पहिल्याच मासिक सभेत हा प्रश्न आक्रमकपणे मांडला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने शहरातील विविध ठिकाणी अत्याधुनिक व आकर्षक कचरा कुंड्या बसविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

मोती तलाव परिसरातील हॉटेल्स, खाऊगल्ल्या आणि आईस्क्रीम पार्लर्समधून मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा ओला कचरा जुन्या कचरा कुंड्यांमध्ये मावत नव्हता. परिणामी कचरा कुंड्यांच्या बाहेर साचत होता. भटक्या कुत्र्यांमुळे हा कचरा परिसरात विखुरला जात असल्याने दुर्गंधी पसरत होती. विशेषतः सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येबाबत सोशल मीडियावरूनही वारंवार नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर शहराच्या सौंदर्याला बाधा ठरणाऱ्या जुन्या कचरा कुंड्या तातडीने बदलण्याची मागणी ॲड. सायली दुभाषी यांनी पालिकेच्या सभागृहात केली होती. प्रशासनाने या मागणीची दखल घेत अखेर नव्या कचरा पेट्या बसविण्याचा निर्णय घेतला.

लोकप्रतिनिधींची सजगता आणि प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे मोती तलाव परिसर अधिक स्वच्छ व सुस्थितीत राहण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचे सावंतवाडीकर नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, शहर स्वच्छतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा