*ज्येष्ठ साहित्यिका पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्त्या आदर्श शिक्षिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*……प्रेम*
रुपे प्रेमाची अनेक
रंग प्रेमाचे अनेक
प्रेम आभाळचे आणि
प्रेम चंद्राचे सुरेख
इथे आईच्या प्रेमाला
कुठे उपमाच नाही
तसे पित्याचे प्रेमही
देई विश्वासाची ग्वाही
प्रेम भगिनीचे बघा
जशी बहरली जाई
प्रेम बंधुचेही इथे
गाणे ममतेचे गाई
जिवाभावाचा तो सखा
प्रेम त्याचे मौल्यवान
सख्यासोबत्यासाठी
देई प्रणाचेही दान
प्रेम जीवनसाथीचं
जसं तेवत्या वातीचं
उधाणत्या वादळाचं
आणि भिजल्या मातीचं
अनुपमा जाधव
