You are currently viewing पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळात ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळात ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन

वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा; घोषणाबाजी करत सरकारचा निषेध

“महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले” ; शेतकऱ्यांना इंधनटंचाईचा फटका; परराष्ट्र धोरणावरून मोदी सरकारवर टीका

कुडाळ :

पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आज कुडाळ शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेनेच्या वतीने माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. कुडाळ शिवसेना शाखेतून जिजामाता चौक मार्गे एसटी स्टॅण्डपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.

यावेळी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ भाजप आमदारांनी पूर्वी म्हटलेले “सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है” हे गाणे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईविरोधात केलेली जुनी भाषणे सायकलला स्पीकर लावून वाजवण्यात आली. वैभव नाईक यांनी स्वतः सायकल हातात घेऊन मोर्चाचे नेतृत्व केले. आंदोलनादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “कहा गये, कहा गये, अच्छे दिन कहा गये?”, “पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो”, “रद्द करा, रद्द करा पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा” अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विविध फलकांच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलचे दर तात्काळ कमी करण्याची मागणी करण्यात आली.

वैभव नाईक म्हणाले, “गेल्या आठ दिवसांत चार वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून पुढेही दरवाढ सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीपाला, दूध, खाद्यपदार्थ, बांधकाम साहित्य अशा सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. कोथिंबिरीची एक पेंडी ७० रुपयांवर पोहोचली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पैसे असूनही पेट्रोल-डिझेल मिळत नाही. पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत आणि त्यांनाच सरकार ‘साठेबाज’ म्हणून हिणवत आहे. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना इंधन मिळणे कठीण झाले आहे.”

तसेच त्यांनी २०१४ पूर्वी पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि रुपयाच्या घसरणीवरून नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन सरकारवर टीका केली होती, मात्र आज त्यांच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे रुपयाचे मूल्य घसरले असून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला.

माजी आमदार जीजी उपरकर म्हणाले, “जनता महागाईने बेहाल झाली आहे. अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. शेतीचा हंगाम तोंडावर आला असून नागरिक व शेतकऱ्यांना पेट्रोल-डिझेल मिळत नाही. हेच मोदी सरकारचे अच्छे दिन आहेत काय? पंतप्रधान अमेरिकेचे गुलाम झाले असून परराष्ट्र धोरण आखण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे सामान्य जनतेला महागाईची झळ सोसावी लागत आहे. जनतेनेही या महागाईविरोधात तीव्र आवाज उठवला पाहिजे, अन्यथा ही महागाई आणखी वाढत राहील.”

या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, सचिन कदम, तालुका संपर्कप्रमुख अतुल बंगे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, माजी उपसभापती जयभारत पालव, पंचायत समिती सदस्य बाळा कांदळकर, अर्चना बंगे, ममता राऊळ, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर, अमित राणे, दीपक आंगणे, एकनाथ धुरी, रवी बुवा कदम, राजेंद्र घाडी, अवधूत मालणकर, भगवान परब, नंदू आंबेरकर, बाळू पालव, सागर भोगटे, विनय पालकर, अशपाक कुडाळकर, समीर पालव, रुपेश तायशेटे, तुषार सामंत, सुरेंद्र तेली, विनय गावडे, पूजा राऊळ, सचिन ठाकूर, महादेव परब, सुनील पवार, हरी वायंगणकर, मंगेश बांदेकर, उमेश परब, सुधीर लुडबे, विरेश परब, संतोष सामंत, रोहन शिरसाट, संजय कदम, बाबू सावंत, रुपेश शिरोडकर, राजेश टंकसाळी, आप्पा मांजरेकर, विनय कदम, प्रताप साईल, श्री. काराणे, दत्तगुरु राऊळ, प्रकाश निकम, बाबी निकम आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा