*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवणींच्या बेटावरुनी…*
आठवणींच्या बेटावरुनी रोजच हिंडत गेले
कितीतरी मग उडू लागले आठवणींचे शेले
शाळेमध्ये फिरून आले पारिजातका खाली
आठवता तो फुले उमलती गेले ते दिन गेले…
बसत होते संध्यासमयी फुले तो झाडत होता
मोह घालतो अजूनी मजला शाळेचा तो ओटा
दिल्या परीक्षा कितीतरी त्या लिहिले पेपर तेथे
माझा मजला दिसतो अजूनी देह तो इवला छोटा..
नदीकिनारी शाळा माझी झाडे किती ती होती
डंवरलेली म्हातारीची, फुलांशी जडली नाती
किती मंदिरे झुळझुळ पाणी स्वच्छ नदी ती छान
सभोवताली हिरवाईच्या रानी पक्षी गाती..
मुक्त हिंडलो धाकदपटशा भिती ती कसली नव्हती
कुठे दवडले आठवणींचे मोहक सुंदर मोती
भानच नव्हते अभ्यासाचे शाळेतच तो होई
अभिमानाने भरून येतो मनेही नव्हती कोती..
जाते हो ते मनही माझे अजून खेड्यावरती
कुईकुई येतो नाद मोटेचा कानी, शेतावरती
लिंबाच्या त्या झाडावरती अजूनी बोलतो होला
निघून गेली पहा माणसे सारी कर्तीसवरती..,
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
