शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती; मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ई-क्लासेससह विविध उपक्रम राबविणार
सावंतवाडी :
विद्यार्थी हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ देणार नाही. ऑक्टोबर महिन्याची हीट वाढली आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तेथील स्तरावर शाळेची वेळ बदलण्याचा निर्णय देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज येथे दिली. दरम्यान इंग्रजी शाळा महत्त्वाच्या आहेत. परंतु मराठी शाळा अडचणीत येणार नाही यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी आणि मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी भविष्यात विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आपण शाळांचा दौरा करत आहोत असे त्यांनी सांगितले.
श्री. भुसे यांचा उद्यापासून सिंधुदुर्ग दौरा आहे. आज त्यांनी रात्री उशिरा येथील राजवाड्याला भेट दिली. यावेळी ऑक्टोबरची हीट वाढल्यामुळे शाळेची वेळ बदलण्याची मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे. याबाबत श्री. भुसे यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ, सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले, नगरसेवक बाबू कुडतरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, प्रांताधिकारी वीरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, तुषार साळगावकर, भूषण सारंग, शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार तसेच शिक्षणाधिकारी किंजवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात हीट वाढली आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मुलांचे नुकसान होणार नाही. त्यांना कोणताही अपाय होणार नाही. या दृष्टीने शाळांची वेळ बदलण्याबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक वाटल्यास त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.
दरम्यान मराठी शाळांबाबत श्री. भुसे यांना विचारले असता ते म्हणाले, इंग्लिश शाळांकडे पालकांना जाण्याचा पालकांचा ओढा आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु मराठी शाळा सुद्धा काही कमी नाही. अनेक विद्यार्थी मराठी शाळेमधूनच घडले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ई-क्लासेस सेवा सुविधा, असे चांगले उपक्रम राबवून या ठिकाणी मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला जाईल. निश्चितच पुढील काळात मराठी शाळांना चांगले दिवस येतील, असाही दावा त्यांनी केला.
पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी विरोधकांवर टीका केली. गेली अनेक वर्षे हेच विरोधक सत्तेत होते. त्यावेळी सुद्धा हेच प्रश्न होते. त्यामुळे हा आजचा प्रश्न नाही. तो त्यांनी सोडवला असता तर आज हा प्रश्न निर्माण झाला नसता.
