शासनमान्य ग्रंथालयांनी 31 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत
सिंधुदुर्ग
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या सन 2026-27 च्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक ग्रंथालयांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव दि. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत, असे आवाहन प्र. जिल्हा ग्रथालय अधिकारी शशांक नाईक यांनी केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांद्वारे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. सन 2026-27 साठीच्या योजनांचे नियम, अटी व अर्जाचे नमुने प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालयांना इमारत बांधकाम व विस्तारासाठी कमाल 25 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. उपरोक्त योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्याने इतर योजनांसाठी प्रस्ताव सादर करू नयेत.
असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये फर्निचर खरेदीसाठी 4 लाख रुपये आणि इमारत बांधकामासाठी (प्रस्ताव फक्त एकदाच) 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्याची तरतूद आहे.
तसेच ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी 2.50 लाख रुपये, विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरणासाठी 2 लाख रुपये, 50, 60, 75, 100, 125 व 150 वर्षे पूर्ण करणाऱ्या ग्रंथालयांच्या महोत्सवी वर्षासाठी 6.20 लाख रुपये तसेच इमारत विस्तारासाठी 10 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रमांच्या आयोजनासाठी अनुक्रमे 1.50 लाख, 2.50 लाख व 3 लाख रुपये, तर ‘बालकोपरा’ स्थापन करण्यासाठी कमाल 6.80 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्रंथालयांनी प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना व संबंधित नियम-अटी पाहाव्यात. आवश्यकतेनुसार संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
इच्छुक ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतींमध्ये विहित मार्गाने दि. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावा. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही प्रस्ताव सादर करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
