पुणे:
कवयित्री गझलकारा शोभा वागळे यांच्या “तरंग” या गझलसंग्रहाचे आणि “गझलांच्या अंतरंगात” या गझल रसग्रहण संग्रह अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन लक्ष्मी अंगण क्लब हाऊस, पिंपळे सौदागर, पुणे येथे रविवार दिनांक २४ मे रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्ष डॉ.अविनाश सांगोलेकर आणि उद्घाटक गझलकार समीक्षक विजय जोशी (विजो) व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर गझलकार सुभाष मोहनदास, गझलकार सुधीर कुबेर, कवयित्री गझलकारा शोभा वागळे आदी उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सुरुवात उद्घाटक विजय जोशी (विजो) तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी दीपदेवतेची आराधना करून सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे स्वागत सौ.प्राची नगरसेकर, सौ. वचना प्रभू, श्री. सुहास प्रभू व दीपक पटेकर यांच्या हस्ते शाल व अनोखी भेटवस्तू देऊन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात अवघ्या काही वर्षात केलेल्या साहित्यिक प्रवासासाठी कवयित्री गझलकारा शोभा वागळे यांचे कौतुक करण्यात आले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रणव बनसोडे यांनी केले.
*दुसऱ्यांच्या गझल रसग्रहणाचा आस्वाद घेणे आणि त्यांचं पुस्तक काढणे यासाठी फार मोठं मन लागतं: (विजो)विजय जोशी*
आज दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन होतंय हा सुवर्णयोग आहे. गझल या विषयाचे आज तरुणांना आकर्षण वाटतं आहे हे चांगलं आहे. गझलेच्या दोन ओळींमध्ये संपूर्ण कविता सामावलेली असते असे सांगताना त्यांनी…
*इतकेच मला जाताना सरणावर कळले होते*
*मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते*
या सुरेश भटांच्या गझलेचा एक शेर ऐकवून गझलेचे महत्त्व आणि वैशिष्ट्य सांगितले. गझलकारा शोभा वागळे यांचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले की, दुसऱ्यांच्या उत्तम रचना निवडणे हे एक कसब आहे, त्याचा आस्वाद घेणे आणि त्या इतरांपर्यंत पोचविण्यासाठी त्याचे रसग्रहण करून पुस्तक काढणे यासारखे महान काम नाही, यासाठी फार मोठे मन लागते.
*वाढत्या वयातही आपल्यापेक्षा लहानांकडून शिकण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना मोठं करते: अध्यक्ष डॉ.अविनाश सांगोलेकर*
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अविनाश सांगोलेकर यांनी शोभा वागळे यांचा साहित्यिक प्रवास यावर भाष्य करताना प्रकाशन सोहळा छोटा असो की मोठा ही तारेवरची कसरत असते असे सांगत दोन्ही पुस्तकांच्या निर्मितीबद्दल त्यांचे कौतुक केले. वाढत्या वयातही आपल्यापेक्षा लहानांकडून मार्गदर्शन घेण्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही म्हणजेच त्यांची लहानांकडून शिकण्याची प्रवृत्तीच त्यांना मोठं करते या शब्दात शोभा वागळेंचे वेगळेपण सांगितले. आज त्यांच्या सोहळ्यात रक्ताच्या नात्याचा परिपाक दिसतोच आहे परंतु गझलेच्या नात्याने जमवलेला परिवार हे त्यांच्यावर असलेलं साहित्यिकांचे प्रेम दाखवून देतं. आपण आपलं साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी आपल्यामध्ये पूर्णपण येण्यासाठी थांबू नये, ज्या त्रुटी राहतील त्या लोक आपल्याला दाखवतील. पण बदलत्या जगाप्रमाणे आपल्यात बदल घडविले पाहिजेत असे ते म्हणाले.
गझलकार श्री.सुधीर कुबेर यांनी सौ.शोभा वागळे यांनी दुसऱ्यांच्या गझलेचं रसग्रहण करून काढलेलं पुस्तक हा एक वेगळाच प्रयोग असून आता शोभा वागळे यांचे नाव बदलून शोभा “वेगळे” केलं पाहिजे असे कौतुकाचे उद्गार काढले. श्री.सुभाष मोहनदास यांनी देखील मनोगतातून शोभा वागळे यांना शुभेच्छा दिल्या. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर उपस्थितांचा गझल मुशायरा संपन्न झाला. यामध्ये गझलकार विजय जोशी, चंद्रकांत धस, किरण वेताळ, मकरंद घाणेकर, दीपक पटेकर, अर्चना मुरुगकर, नंदिनी काळे, प्रणव बनसोडे, अशोक भांबुरे, निशा दळवी, श्रीकांत वाघ, सौ.स्मिता शिंदे, सुधीर कुबेर, सुभाष मोहनदास यांनी भाग घेतला. कार्यक्रमाची सांगता अध्यक्ष डॉ अविनाश सांगोलेकर यांच्या गझलेने करण्यात आली.
कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार नंदिनी काळे यांनी मानले. यावेळी जयंती पोद्दार, विजोय पोद्दार, यश नगरसेकर, श्रीमती शोभा बनसोडे यांच्यासह शोभा वागळे यांचे जवळचे नातेवाईक आणि साहित्यिक मित्रपरिवार उपस्थित होता.
