महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव व सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री विकास खारगे आयएएस यांनी अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने त्यांच्या वडिलांना दिलेला जीवन गौरव पुरस्कार एका भव्य समारंभात स्वीकारला. अमरावतीच्या सर्वात भव्य अशा सिकची रिसॉर्ट मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक कीर्तीचे संशोधक अबुधाबीचे डॉ.चंद्रशेखर मुरादे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर तर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई इटनकर रिलायन्स उद्योग समूहाचे राज्य समन्वयक श्री देवेंद्र खडसे जीएसटीचे उपायुक्त श्री महेबूब कासार मिशनचे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे व प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर हे विचार पिठावर उपलब्ध होते. मागील महिन्यात अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीच्या कार्यकारिणीच्या सभेत श्री विकास खारगे यांच्या वडिलांना म्हणजे श्री शंकरराव खारगे यांना त्यांचे शैक्षणिक व सामाजिक जीवनात केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे त्यांना रितसरपत्र देण्यात आले होते. पण त्यांचे वय 96 असल्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. शिवाय इचलकरंजी ते अमरावती हा मोठा प्रवास असल्यामुळे त्यांनी येण्यास असमर्थता दर्शविली होती. म्हणून श्री शंकरराव खारगे यांच्या वतीने त्यांचा जीवन गौरव पुरस्कार त्यांचे सुपुत्र व सुप्रसिद्ध सनदी अधिकारी अप्पर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी स्वीकारला. श्रीमती शारदाताई इटनकर यांच्या हस्ते हा जीवनगौरव पुरस्कार तसेच सन्मान चिन्ह त्यांना देण्यात आले. या समारंभानिमित्त श्री विकास खारगे यांनी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना मार्गदर्शन केले. आपल्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या वडिलांनी केलेल्या संस्काराचा आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच अमरावती शहरातील नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेम किशोर चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चि. मराठे यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. पल्लवी येरुळकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सादर करण्यात आले.
