ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष श्री. विद्याधर ठाणेकर यांच्या हस्ते प्रकाशन; साहित्यिकांनी रुपेश पवार यांच्या संवेदनशील लेखनाचे केले कौतुक
ठाणे :
दिव्यांगत्वावर मात करत साहित्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे अॅड. रुपेश पवार यांच्या “निळ्याशा डोहात” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक व प्रकाशक श्री. विद्याधर ठाणेकर यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. सिद्धी फ्रेण्ड्स पब्लिकेशनतर्फे हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला असून सतीश पुंड यांनी पुस्तकाच्या कलात्मक प्रकाशनासाठी विशेष सहाय्य केले.
हा प्रकाशन सोहळा सोमवार, १८ मे २०२६ रोजी एकविरा देवी मंदिर, सावली सिनिअर सिटीझनस् असोसिएशन यांच्या वतीने श्रीरंग सोसायटी, आनंद पार्क, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व प्रकाशक श्री. विद्याधर ठाणेकर उपस्थित होते.
यावेळी सिद्धी फ्रेण्ड्स पब्लिकेशनचे प्रकाशक साहित्यिक विनोद पितळे यांनी अॅड. रुपेश पवार यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करताना सांगितले की, “रुपेश पवार दिव्यांग असला तरी आम्ही त्याला दिव्यांग मानत नाही. तो साहित्य कलेतला कलंदर माणूस आहे. तो अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील लेखन करतो. आपल्या लिखाणात तो कधीही अवघड शब्दांचा वापर करत नाही. साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांच्या मनाला भिडणारे लेखन करणे हे खरे कठीण काम असते.”
अध्यक्षीय भाषणात श्री. विद्याधर ठाणेकर यांनी ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याची माहिती देत सर्वांनी वाचक सभासद होऊन या संस्थेला चालना देण्याचे आवाहन केले. “ठाणे शहराची ही जुनी वास्तू टिकवण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी “निळ्याशा डोहात” या काव्यसंग्रहातील विविध विषयांवरील कवितांचे कौतुक करत वाचकांनी या पुस्तकाचे स्वागत करावे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात साहित्यिका डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी रुपेश पवार यांच्या “निर्वासित पक्षी” आणि “आत्ताच युग” या कविता सादर केल्या. “आत्ताच युग” ही प्रेमावर आधारित विनोदी शैलीतील कविता तर “निर्वासित पक्षी” ही युद्धाच्या पार्श्वभूमीवरची संवेदनशील कविता असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यिक विनोद पितळे यांनी “आमच्याकडे पाऊस पडतो” ही कविता सादर करून सिमेंटच्या जंगलातील पावसाचे वास्तव प्रभावीपणे उभे केले. वृषाली पाटणे यांनी मैत्री आणि प्रेम या विषयांवरील कविता सादर केल्या. अशा प्रकारे रुपेश पवार यांच्या चार कवितांचे प्रभावी सादरीकरण या कार्यक्रमात झाले.
कार्यक्रमाचे धडाकेबाज सूत्रसंचालन नाट्य तुषारचे संचालक, कवी व समाजसेवक श्री. राजेंद्र गोसावी यांनी केले. यावेळी त्यांनी रुपेश पवार यांच्या सहकार्यातून खाद्यपदार्थांची रेडी टू इट पिठे उपस्थित सदस्यांना भेट म्हणून देत अधिक महिन्याचे सत्पात्रीदान व्रत पूर्ण केले.
या कार्यक्रमाला रुपेश पवार यांचे वडील बी. के. पवार, आजोबा नथुराम जाधव, आदित्य बिर्ला कॅपिटलच्या मुलुंड शाखेच्या व्यवस्थापक रेश्मा नितीन मोरे, सहकारी लिना मंकरद घाटगे, ठाणेजनमित्रचे निशिकांत महांकाळ, लालपरीचे रत्नपाल जाधव तसेच अॅड. संघ्या म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मनोगतात अॅड. रुपेश पवार म्हणाले, “निळ्याशा डोहात हा काव्यसंग्रह अत्यंत संवेदनशील आहे. या संग्रहातील कविता २४ वर्षांपूर्वी लिहिल्या असल्या तरी त्या आजच्या काळातल्याच वाटतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. २३ वर्षांपूर्वीच्या काळात आणि आजच्या काळात कोणताही मोठा फरक झालेला नाही. त्या काळातील समस्या आजही समाजात कायम आहेत.”
यावेळी त्यांनी सावली ज्येष्ठ नागरिक संघाचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी साहित्यिका डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी आभार प्रदर्शन केले.
सावली सिनिअर सिटीझनस् असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीम. उल्का चव्हाण, सचिव श्रीम. वृषाली पाटणे, श्रीम. प्रिती जाधव, महिला मंडळ अध्यक्षा श्रीम. कुंदा कोटस्थाने, उपाध्यक्षा श्रीम. कल्पना पुंड तसेच संस्थेच्या सर्व महिला सदस्यांनी रुपेश पवार व राजेंद्र गोसावी यांच्या पुढील साहित्यिक व सामाजिक उपक्रमांना शुभाशीर्वाद दिले.
हा कार्यक्रम चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाट्य तुषार यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता.
