You are currently viewing बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

मुंबई:

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड अलीकडेच हायकमांडने केली, त्यापाठोपाठ आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज दिल्लीत असून पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस संघटनेत बदल होणार असल्याची चर्चा सुरु होती, मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी भूमिका सांभाळणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी केली आहे. त्यासाठी थोरात यांच्या दिल्लीवारीला महत्व प्राप्त झालं आहे. अलीकडेच मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी आमदार भाई जगताप यांची निवड करण्यात आली, त्यानंतर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारीही सुरू केली आहे.

राज्यातील काँग्रेसला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावं अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु होती, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापेक्षा स्वत:हून या पदातून मुक्त होण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत, यात मुख्यत: विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे, विदर्भात काँग्रेसला मिळालेलं यश पाहता विदर्भातून नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर तर मराठवाड्यातून अमित देशमुख यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहे, बाळासाहेब थोरात हे कडवट काँग्रेसी आहेत, त्यांनी कधीही पक्षातील पदासाठी लॉबिंग केली नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 2 =