You are currently viewing शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव देणाऱ्या उपक्रमाचे शतक पूर्ण”

शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव देणाऱ्या उपक्रमाचे शतक पूर्ण”

“शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव देणाऱ्या उपक्रमाचे शतक पूर्ण”*

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. १ येथून सुरू झालेला “इतिहासाची साधने व प्रदर्शन” हा उपक्रम आज विद्यार्थ्यांना जिवंत इतिहासाचा अनुभव देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये नाममात्र शुल्कात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहास केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष वस्तू, शस्त्रे आणि ऐतिहासिक साधनांच्या माध्यमातून समजण्याची संधी मिळत आहे.
हा उपक्रम दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत अंतर्गत राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू संवर्धन विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात असून, या उपक्रमाचे मार्गदर्शक सावंतवाडी मळगाव गावचे सुपुत्र इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे हे आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाचा अभ्यास रंजक, जिवंत आणि अनुभवात्मक पद्धतीने करता येत आहे.
आतापर्यंत ९५ शाळांमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात आला असून १३० हून अधिक शाळांना त्याचा लाभ झाला आहे. विशेष म्हणजे, दिनांक १४ मे रोजी श्री शंभू जन्मोत्सवानिमित्त गोवा राज्यातील पेडणे तालुक्यातील श्री देवी भगवती मंदिर, पार्से येथे या उपक्रमाचा १०० वा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमालाही विद्यार्थी, पालक आणि इतिहासप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रदर्शनामध्ये मराठा धोप, राजपूत धोप, खंडा तरवार, नागीन तरवार, मराठा गुर्ज, जिरेटोप, ढाल, वाघनखे, कट्यार, जंबिया, दांडपट्टा, बाण आणि उर्मी यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे विद्यार्थ्यांसमोर मांडली जातात. प्रत्येक शस्त्राचा उपयोग, त्याची रचना आणि त्यामागील ऐतिहासिक संदर्भ विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जातात. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही शस्त्रे प्रथमच प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता आणि कुतूहल निर्माण होताना दिसते.
याशिवाय प्रदर्शनात विविध लिखित ऐतिहासिक साधनांचाही समावेश असतो. शिवचरित्र, शिवभारत, छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती, शिवभूषण, शिवकालीन शस्त्रास्त्रे यांसारखे महत्त्वाचे १५० ऐतिहासिक ग्रंथ, मोडी पत्रे, ताम्रपट, दानपत्रे आणि शंभूराजांचे हस्ताक्षर , शिवरायाचे हस्ताक्षर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवले जाते. लिखित साधनांमधून इतिहास कसा समजतो आणि त्यांचे संशोधनात किती महत्त्व आहे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
भौतिक साधनांमध्ये ऐतिहासिक चलने, ब्रिटिशकालीन पोस्ट पत्रे, शाहीचा हौद व बोरू, कवड्याची माळ, जुनी टाळी, ऐतिहासिक स्क्रोल होल्डर, सावरकरांनी साकारलेला भारताचा ध्वज, तोफेची प्रतिकृती आणि लोखंडी तोफगोळा यांसारख्या वस्तूंचे प्रदर्शन केले जाते. तसेच विरगळ, सतीशिळा, शिलालेख, आरमारातील जहाजे, गड-कोटांचे प्रकार, शिवरायांचे आज्ञापत्र, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची वंशावळ आणि आंग्रेंचे मानचिन्ह यांची छायाचित्रेही तसेच मराठा आरमारातील जहाज प्रतिकृती विद्यार्थ्यांना दाखवली जातात.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना इतिहासाची प्राथमिक ओळख करून दिली जाते. व गड कोट दुर्ग संवर्धन ह्या जनजागृती व इयत्ता पाचवी ते आठवीच्या अभ्यासक्रमानुसार इतिहासातील साधनांचे भौतिक, मौखिक आणि लिखित असे तीन प्रकार समजावून सांगितले जातात. त्यानंतर प्रत्येक वस्तू, शस्त्र आणि लिखित साधनांचे प्रत्यक्ष सादरीकरण केले जाते. शिवभारत मधील काही प्रसंगांचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना इतिहास जिवंत स्वरूपात अनुभवण्याची संधी दिली जाते. सुरक्षिततेची काळजी घेऊन विद्यार्थ्यांना काही शस्त्रे हाताळण्याचाही अनुभव दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी विशेष आकर्षण निर्माण होत आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व, शिवविचारांची गरज आणि संस्कारमूल्यांचे महत्त्व पालकांपर्यंत पोहोचविले जाते. तसेच स्त्रीयांच्या आत्मसंरक्षणाविषयी माहिती दिली जाते व आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि संस्कारांची जपणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. शिवचरित्र आणि इतिहासातून प्रेरणा घेऊन सक्षम आणि जागरूक पिढी घडविण्याचे कार्य हा उपक्रम प्रभावीपणे करीत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा उपक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर कौतुकास पात्र ठरत असून, आगामी काळात आणखी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा