देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर
घरांची छपरे उडाली, शेतीचे मोठे नुकसान; पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार प्रशासनाची संयुक्त पाहणी
देवगड :
देवगड तालुक्यात शनिवारी सायंकाळी अचानक निर्माण झालेल्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे अनेक गावांना मोठा फटका बसला. बापर्डे, सौंदाळे, फणसगाव, मुटाट, विठ्ठलादेवी, गोवळ, तांबेवाडी, सोमलेवाडी आदी भागांत झाडे उन्मळून पडणे, घरांची छपरे उडणे, सिमेंट पत्रे तुटणे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. या नुकसानीची पाहणी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे केली.
तहसीलदार रमेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून संबंधित विभागांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
वृद्ध महिलेला दिला धीर
शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळली. घरांच्या छपरांवरील पत्रे उडाली तर काही शाळांच्या इमारतींचेही नुकसान झाले. गोवळ तांबेवाडी येथे शाळेचे छप्पर उडून जवळील एका वृद्ध महिलेच्या घरावर कोसळले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज पाहणी दौऱ्यावेळी संबंधित वृद्ध महिलेला सभापती गणेश राणे यांनी धीर देत नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. “काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगत त्यांनी महिलेला आधार दिला.
केळी बागा, झाडांचे मोठे नुकसान
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार बापर्डे ते सौंदाळे परिसराचा व्यापक दौरा करण्यात आला. बापर्डे, गोवळ, फणसगाव, सौंदाळे, गोवळ तांबेवाडी, सोमलेवाडी आणि विठ्ठलादेवी परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. काही ठिकाणी केळीच्या बागांचे नुकसान झाले असून अनेक मोठी व जुनी झाडे उन्मळून पडली आहेत.
घालवली ब्रह्मदेव मंदिर रस्ता वाहतुकीस अयोग्य
घालवली ब्रह्मदेव मंदिर परिसरातील रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून आलेल्या गाळामुळे वाहतुकीस अयोग्य झाला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून पावसापूर्वी वाहतुकीस सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात येणार असल्याची माहिती सभापती गणेश राणे यांनी दिली.
शासनाकडून मदतीचे आश्वासन
अनेक घरांची छपरे उडाल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने काही घरांमध्ये त्यावेळी कोणी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सभापती गणेश राणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गोवळ परिसरातील आश्विन बाबाजी सावंत, विष्णू बाबाजी घाडी, मधुकर शंकर माळकर, संदीप विनायक माळकर, निर्मिला शिवराम तांबे आणि रघुनाथ गोपाळ मोरे यांचे नुकसान झाले आहे. तसेच फणसगाव येथील मोहन वासुदेव पालकर, दिलीप पांडुरंग नर, रुक्मिणी अंबाजी गुरव, यशवंत राजाराम महाडिक, महेंद्र नारायण नरसाळे, सत्यवान भास्कर जगताप व प्रकाश रामचंद्र नरसाळे यांनाही मोठा फटका बसला आहे.
कुणकवण परिसरातील यशवंत सिताराम विचारे, अर्जुन राजाराम जनक, महादेव शिवराम राणे, अनंत सखाराम देवळेकर आणि शशिकांत आबा तोरस्कर यांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले असून प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदार रमेश पवार यांनी सर्व पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून शासन दरबारी अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष पाहणीत प्राथमिक आकडेवारीपेक्षाही अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
